अनुदानित तुकडीवरही शुल्क आकारणी

By admin | Published: July 15, 2017 01:54 AM2017-07-15T01:54:22+5:302017-07-15T01:54:22+5:30

कारंजा पालिकेचा ठराव : गोरगरीब विद्यार्थ्यांना सोसावा लागणार आर्थिक भुर्दंड

Charges for the subsidized batch | अनुदानित तुकडीवरही शुल्क आकारणी

अनुदानित तुकडीवरही शुल्क आकारणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड: येथील नगर परिषदेच्या मुलजी जेठा कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेतील प्रवेशाचे निकष ठरवताना ३ हजार रुपये शुुल्क आकारण्याचा ठराव पारित करण्यात आला आहे. नियमानुसार अशा अनुदानित तुकडीवर शुल्क आकारणी करता येत नाही; परंतु पालिकेच्या ठरावामुळे आता गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
सामान्य विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. तेव्हा गरीब व होतकरू विद्यार्थी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कनिष्ठ महाविदयालयात प्रवेश घेतात; पण या वर्षी नगर परिषदेने अजब ठराव घेतला आहे. या ठरावानुसार शाळेला ३ हजार रुपये शुल्क आकारण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे गरीब दलित व अल्पसंख्याक होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा फज्जा उडाला आहे.
वास्तविकत: गरीब दलित व अल्पसंख्याक विद्याथ्यार्साठी मोफत शिक्षणाची व्यवस्था नगर परिषदेने करायला हवी होती; परंतु तसे न करता उलटपक्षी शुल्क आकारणी करून शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. या कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी व मराठीसाठी एक शिक्षक व जीवशास्त्र शिकविण्यासाठी एक शिक्षक कार्यरत आहे. विज्ञात शाखेत महत्त्वाचे मानले जाणारे भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांच्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीनंतर जागा रिक्त झालेल्या आहे. त्या नगर परिषदेने अद्यापही भरलेल्या नाहीत. अपुरा शिक्षक वर्ग असतानाही अतिरिक्त तुकडी घेण्याचा उत्साह मात्र नगर परिषदेने दोन वर्षाआधी दाखविला आहे. एक अनुदानित व दोन विनाअनुदानित तुकड्यांना खासगी शिकवणी वर्गातील शिक्षक शिकवतात. या शिक्षकांच्या पात्रता शंकास्पद आहे. २२५ विद्यार्थ्यांना शिक्षण सुविधा, प्रयोगशाळा आदी संसाधने नसतानाही प्रवेश देऊन त्यांच्या भवितव्याशी गंभीर खेळ खेळला जातो. एवढेच नव्हे तर प्राचार्य मेश्राम यांच्या निवृत्तीनंतर गतवर्षापर्यंत नियमित प्राचार्याशिवाय महाविद्यालय व शाळा चालविण्याचे कामही पालिकेने केले आहे. या वर्षी मुख्याधिकारी व प्रशासन अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यामुळे प्राचार्य पदाची नियुक्ती झाली. संपूर्ण विद्याालयात १,१०० पेक्षा जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळेत १८ शिक्षकांची कमतरता असताना शिक्षणाचा रथ नगर परिषदेचे समर्थ हात ओढत आहे. या संबध व्यवस्थेची जिल्हाधिकारयांनी दखल घेऊन या प्रकाराची चौकशी करावी, अशी पालकांची मागणी आहे. दरम्यान, या महाविद्यालयात शिक्षक भरती प्रक्रिया होण्यापूर्वीच संभाव्य उमेदवारांना शिकविण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. शिकवणी वर्ग चालविणारे चार शिक्षक येथे नियमित शिक्षकांसारखे काम करीत आहे. मुलाखत होण्यापूर्वीच या शिक्षकांना काम सोपविल्याने निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

नगर परिषदेने शुल्क आकारणीचा ठराव घेऊन मुख्याध्यापक यांच्याकडे पाठविला त्याबाबत आपल्याला काही सांगता येणार नाही.
- प्रमोद वानखडे
मुख्याधिकारी न.प. कारंजा

आम्हाला नगर पालिकेकडून ठराव प्राप्त झाला आहे. त्यांच्या ठरावानुसार आम्ही विद्यार्थ्यांना ३ हजार शुल्क आकारत आहोत.
- रमेश निशानराव
मुख्याध्यापक
मुलजी जेठा कनिष्ठ महाविद्यालय

Web Title: Charges for the subsidized batch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.