वाशिम येथे सुरू असलेल्या चतुर्वेद संहिता महायज्ञाची उत्साहात सांगता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 07:07 PM2017-11-03T19:07:15+5:302017-11-03T20:53:06+5:30
वाशिम: तीन वर्षे तीन महिण्यात नर्मदा नदीची परिक्रमा पूर्ण करणा-या दिवंगत पंडितकाका धनागरे महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त २७ आॅक्टोबरपासून येथे सुरू असलेल्या चतुर्वेद संहिता महायज्ञाची सांगता ३ नोव्हेंबरला करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: तीन वर्षे तीन महिण्यात नर्मदा नदीची परिक्रमा पूर्ण करणा-या दिवंगत पंडितकाका धनागरे महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त २७ आॅक्टोबरपासून येथे सुरू असलेल्या चतुर्वेद संहिता महायज्ञाची सांगता ३ नोव्हेंबरला करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
अमृत महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी भाविकांच्या साक्षीने पुणार्हूतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रामुख्याने गोविंदगिरी महाराज उर्फ किशोर व्यास, करवीर पिठाचे शंकराचार्य वेदमूर्ती विद्यानृसिंह भारतीय स्वामी महाराज, माधवानंदतिर्थ यती महाराज, गणेश्वरशास्त्री द्राविड, राजेश्वरशास्त्री जोशी, कृष्णशास्त्री आर्वीकर, विश्वनाथ जोशी, विजयकाका पोफळी महाराज यांची उपस्थिती होती. यांचे पूजन झाले.
यावेळी बोलताना गोविंदगिरी महाराज म्हणाले की, जगाचे कल्याण होण्यासाठी वेदांचे अध्ययन होणे गरजेचे आहे. सुख मिळविण्याची धडपड म्हणजेच जीवन आहे. मानवी जिवनाचा सखोल व व्यापक विचार वैदिक संस्कृतित दडलेला असल्याने ही संस्कृतीच सर्वश्रेष्ठ आहे, असे त्यांनी सांगितले. उपस्थित इतर मान्यवरांनीही भाविकांचे उद्बोधन केले. शुक्रवारी सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत वाशिम नगरीत शोभायात्रा निघाली असता, वाशिमकर जनतेने पुष्पवृष्टी करून ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत केले. दरम्यान, चतुर्वेद संहिता महायज्ञाची सांगता झाल्यानिमित्त शनिवार, ४ नोव्हेंबरला वाशिमच्या वासुदेव आश्रमात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.