कोरोना रोखण्यासाठी वाशिम जिल्हा सीमेवर पुन्हा चेकपोस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 11:57 AM2021-02-21T11:57:39+5:302021-02-21T11:57:52+5:30
Washim News जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार जिल्हा सीमांवर पुन्हा चेक पोस्ट सुरू करण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असताना नजीकच्या जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार जिल्हा सीमांवर पुन्हा चेक पोस्ट सुरू करण्यात येत आहेत. त्यात कारंजा तालुक्यात पाच ठिकाणी चेकपोस्ट सुरू करण्यात आल्या असून, येथे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या आठवडाभरातच जिल्ह्यात ३०० पेक्षा अधिक लोकांना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले आहे. त्यात वाशिम जिल्ह्यालगतर असलेल्या अमरावती, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांत कोरोनाचा उद्रेक झाला असून, या जिल्ह्यातील हजारो नागरिक दरदिवशी वाशिम जिल्ह्यात बिनदिक्कत प्रवास करीत आहेत. यातून वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग अधिकच फोफावण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार वाशिम जिल्ह्याच्या सीमांवर चेकपोस्ट सुरू करण्यात येत आहेत. कारंजा तालुक्यातील दोनद, खेर्डा, ढंगारखेड, महागाव आणि सोमठाणा येथे कारंजाचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिलेल्या आदेशानुसार चेकपोस्ट सुरू करण्यात आल्या असून, या ठिकाणी परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांची तपासणी करूनच जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे.
प्रत्येक चेकपोस्टवर ४ कर्मचारी
कारंजा तहसीलदारांच्या आदेशानुसार जिल्ह्याच्या सीमेवर सुरू करण्यात आलेल्या पाच चेकपोस्टवर दोन आरोग्य कर्मचारी आणि दोन पोलीस मिळून चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी येणारी वाहने पोलिसांकडून थांबविण्यात येतात. त्यानंतर आरोग्य कर्मचारी दुचाकीवरील किंवा चार चाकी वाहनामधील प्रवासी नागरिकांची २४ तास तपासणी करीत आहेत.
संदिग्धांची रवानगी आरोग्य केंद्रात
जिल्ह्याच्या सीमेवर सुरू करण्यात आलेल्या चेकपोस्टवर परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केल्यानंतर त्यांना ताप किंवा इतर लक्षणे आढळून आल्यास त्यांना तातडीने नजीकच्या आरोग्य केंद्रात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. या तपासणीत कोणत्याही व्यक्तीला कोरोना संसर्ग असल्याचे आढळल्यास संबंधित जिल्हा आरोग्य विभागाला त्याची माहिती देण्यात येणार आहे.
अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यात सुरू असलेला कोरोना संसर्गाचा उद्रेक लक्षात घेता या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची वाशिम जिल्ह्याच्या सीमेवरच तपासणी करण्यासाठी पाच चेकपोस्ट सुरू करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी आरोग्य विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
-धीरज मांजरे,
तहसीलदार, कारंजा