रेशनच्या तांदळात होतेय रासायनिक खताची भेसळ : मानोरा तालुक्यातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 07:39 PM2018-01-22T19:39:57+5:302018-01-22T19:41:21+5:30
इंझोरी : गोरगरीब जनतेला सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत वितरित करण्यात येत असलेल्या तांदळात चक्क रासायनिक खताची भेसळ करण्यात आली आहे. मानोरा तहसील अंतर्गत येणा-या इंझोरी येथील स्वस्तधान्य दुकानात हा प्रकार उघडकीस आला असून, यामुळे गोरगरीब जनतेच्या जिवाशी खेळ करण्यात येत असल्याचे त्यावरून स्पष्ट होत आहे.
नरेश आसावा / लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी : गोरगरीब जनतेला सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत वितरित करण्यात येत असलेल्या तांदळात चक्क रासायनिक खताची भेसळ करण्यात आली आहे. मानोरा तहसील अंतर्गत येणा-या इंझोरी येथील स्वस्तधान्य दुकानात हा प्रकार उघडकीस आला असून, यामुळे गोरगरीब जनतेच्या जिवाशी खेळ करण्यात येत असल्याचे त्यावरून स्पष्ट होत आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत स्वस्तधान्य दुकानातून पिवळ्या, पांढ-या आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्याचे स्वस्तदराने वितरण करण्यात येते. लाखो गोरगरीबांच्या उदरभरणाचा प्रश्न या प्रणालीमुळे ब-याच प्रमाणात सुटतो. तिन्ही शिधापत्रिकांवर धान्य वितरणाचे प्रमाण वेगवेगळे आहे. या प्रणालींतर्गत इंझोरी येथेही लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यासाठी स्वस्तधान्य दुकान आहे. गावातील जवळपास ९५ टक्के कुटूंब या स्वस्तधान्य दुकानातून शिधापित्रकांवर प्रमाणानुसार धान्य घेतात. या अंतर्गत सध्या स्वस्तधान्य दुकानातून गहू आणि तांदळाचे वितरण करण्यात येत आहे. आधीच स्वस्तधान्य दुकानातून मिळणारे धान्य फारसे दर्जेदार नसताना आता त्यात रासायनिक खताची भेसळही करण्यात आली असल्याचे इंझोरी येथील स्वस्तधान्य दुकानदाराला पुरवठा विभागाकडून मिळालेल्या धान्यावरून स्पष्ट झाले आहे. या दुकानातून गत महिन्यापासून रासायनिक खताची भेसळ असलेल्या तांदळाचे वाटप होत आहे.
माझ्या स्वस्तधान्य दुकानातून वितरीत करण्यात आलेल्या तांदळात रासायनिक खतांचे दाणे असल्याचे शिधापत्रिकाधारकांनीच सांगितले. सुरुवातीला आपल्यालाही हे कळले नव्हते. ग्राहकांच्या तक्रारीनंतर आपण सर्वांसमोर नवे पोते उघडून दाखवित ही आपली चूक नसल्याचे स्पष्ट केले. आम्हाला प्राप्त झालेल्या तांदळाच्या पोत्यांतच ही भेसळ आहे.
- मनोज जयस्वाल
स्वस्तधान्य दुकानदार, इंझोरी ता. मानोरा
स्वस्तधान्य दुकानातील तांदळात रासायनिक खतांची भेसळ असल्याचे आम्हाला दिसून आले आहे. हा ग्रामस्थांच्या जिवाशी खेळ असून, आम्ही स्वस्तधान्य दुकानातील पुरवठा तात्काळ बंद करण्याच्या सूचना स्वस्तधान्य दुकादाराला दिल्यात. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई आवश्यक आहे.
- विनादेवी जयस्वाल, सरपंच, इंझोरी