शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांची पूर्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 06:39 PM2018-12-28T18:39:08+5:302018-12-28T18:39:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : रब्बी हंगामातील पिकांना विविध स्वरूपातील रासायनिक खतांची मात्रा देणे गरजेचे ठरत असताना जिल्ह्यात रासायनिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रब्बी हंगामातील पिकांना विविध स्वरूपातील रासायनिक खतांची मात्रा देणे गरजेचे ठरत असताना जिल्ह्यात रासायनिक खतांचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकºयांची पंचाईत झाली होती. त्यातच गत महिनाभरापासून जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया खताचा दाणाही उपलब्ध नसल्याने गहू, हरभरा ही पिके संकटात सापडली होती. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर जिल्ह्यात २७ डिसेंबर रोजी २४०० मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध करण्यात आले आहे.
जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढले आहे. सुरुवातीला गहू पिकाची पेरणी घटण्याची शक्यता वर्तविली जात होती; परंतु भारनियमनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर या पिकाचे क्षेत्रही वाढले असून, सद्यस्थितीत जवळपास २४ हजार हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली असून, हे पीक आता जोम धरू पाहत आहे. त्याशिवाय हरभरा, मका, रब्बी ज्वारीसह इतर पिकेही तरारली असल्याने या पिकांना खतांची मात्रा देणे आवश्यक झाले होते; परंतु जिल्ह्यात खतांची मागणी वाढत असतानाही तुटवडा निर्माण झाला होता. प्रत्यक्षात यंदाच्या रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने २७ हजार ३०० मेट्रिक टन खतांची मागणी नोंदविली होती. सुरुवातीच्या काळात शेतकºयांकडून खतांची मागणी फारशी होत नव्हती; परंतु बदलल्या वातावरणानंतर खतांची मागणी वाढली असतानाच जिल्ह्यात खंताचा तुटवडा निर्माण झाला. इतर रासायनिक खते काही प्रमाणात उपलब्ध असली तरी, जिल्ह्यातील चारशेहून अधिक कृषीसेवा केंद्रांपैकी एकाही कृषी सेवा केंद्रावर युरियाचा दाणाही शिल्लक मिळणे कठीण झाले होते. शेतकºयांची ही समस्या लोकमतने वृत्ताच्या माध्यमातून उजागर केली. त्याची दखल कृषी विभागाने घेऊन जिल्ह्यात २४०० मेट्रिक टन युरिया उपलब्ध केला आहे. त्यामुळे आता पिकांना खत देणे शक्य होणार आहे.