जलस्रोतांची रासायनिक तपासणी; राज्यात बुलडाणा प्रथम तर वाशिम तृतिय क्रमांकावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 01:54 PM2018-12-07T13:54:07+5:302018-12-07T13:57:30+5:30
२.६९ लाखांपैकी नोव्हेंबरअखेर १.५१ लाख पाणी नमुने गोळा झाले असून, यामध्ये राज्यात बुलडाणा प्रथम तर वाशिम जिल्हा तृतिय क्रमांकावर आहे.
वाशिम : सन २०१८-१९ या वर्षातील मान्सून पश्चात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक तपासणी १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१८ या दरम्यान करण्याच्या सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत २.६९ लाखांपैकी नोव्हेंबरअखेर १.५१ लाख पाणी नमुने गोळा झाले असून, यामध्ये राज्यात पश्चिम वºहाडातील बुलडाणा प्रथम तर वाशिम जिल्हा तृतिय क्रमांकावर आहे. या प्रक्रियेत अकोला जिल्हा माघारल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर नागपूर (एमआरएसएसी) नागपूर यांनी तयार केलेल्या जीओफेन्सिंग मोेबाइल अॅप्लीकेशनचा वापर करून जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांचे व स्रोतांची रासायनिक तपासणीसाठी पाणी नमुने गोळा करण्याच्या सूचना सर्व जिल्हा परिषदांच्या पाणी पुरवठा विभागाला देण्यात आल्या होत्या. या अंतर्गत ३० आॅक्टोबर २०१८ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत राज्यभरातील २ लाख ६९ हजार २४७ स्रोतांपैकी १ लाख ५१ हजार १२८ पाणी नमुने गोळा करण्यात आले आहेत. या प्रक्रियेत पश्चिम वºहाडातील बुलडाणा जिल्ह्याने ९९.०५ टक्के नमुने गोळा करीत पहिला क्रमांक पटकावला, तर वाशिम जिल्ह्याने ८५.१४ टक्क्यांसह तिसरा क्रमांक पटकावला. या प्रक्रियेत उस्मानाबाद जिल्हा ९७.९१ क्रमांकासह दुसऱ्या स्थानावर आहे. या प्रक्रियेत पहिल्या दहा जिल्ह्यात अमरावती, नाशिक, धुळे, लातूर, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून राबविण्यात येणारी ही प्रक्रिया यशस्वी ठरत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यासाठी जिल्हा, तालुका व ग्राम पंचायतींचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आता येत्या २५ दिवसांत सर्व जिल्हा परिषदांना पाणी नमुने गोळा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे.
कौतुकाची थाप
पाणी नमुने तपासणीत नोव्हेंबर अखेरीस पहिल्या १० क्रमांकापर्यंत असलेल्या जिल्हा परिषदांचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने कौतुक केले आहे. ही बाब पश्चिम वºहाडातील बुलडाणा, वाशिम जिल्हा परिषद प्रशासनाचा आत्मविश्वास वाढविणारी असून, अन्य प्रशासकीय कामगिरीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे बोलले जात आहे.