रासायनिक पध्दतीने पिकविलेले आंबे आरोग्यास घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 06:25 PM2019-05-08T18:25:06+5:302019-05-08T18:25:28+5:30
बाजारात येणारा आंबा हा रासायनिक पध्दतीने पिकविल्या जात असल्याने तो नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे.
- नंदकिशोर नारे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आंबा फळे पिकविण्याचे एक शास्त्र आहे. योग्य पद्धतीने फळे पिकविल्यास रंगाचा आकर्षकपणा मिळवितानाच चांगला स्वादही मिळतो. परंतु बाजारात येणारा आंबा हा रासायनिक पध्दतीने पिकविल्या जात असल्याने तो नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. ग्रामीण भागातील आंबा उत्पादक वगळता नैसर्गिंक पध्दतीने पिकविलेला आंबा बाजारात दिसेनासा झाला आहे. विशेष हा आंबा नागरिक ओळखत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे मात्र अन्न व औषध प्रशासनाचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे.
नैसर्गिकरीत्या फळे पिकताना त्यामध्ये इथिलिन वायू तयार होतो व फळे पिकण्याची क्रिया सुरू होते. प्रत्येक फळानुसार ही नैसर्गिक प्रक्रिया फळे काढल्यानंतर २ ते ५ दिवसांनी सुरू होते. हा अवधी जास्त असल्याने अनेक फळ उत्पादक फळे लवकर पिकविण्यासाठी काही व्यापारी कॅल्शियम कार्बाईडचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. कॅल्शियम कार्बाईडवर बंदी असतांना सुध्दा हा प्रकार सर्रास दिसून येतो. याकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देवून हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा प्रकार बंद करणे गरजेचे आहे.
गवती पेेंढयाच्या थरावर पिकतात नैसर्गिक फळे
सर्वसाधारणपणे आंब्याची फळे ७.३० सें.मी. ते १० सें.मी. जाडीचा भातपेंढा किंवा गवती पेंढ्याच्या थरावर फळांचा एक थर देऊन पिकवतात. अशा पद्धतीने ठेवलेली फळे ८ ते १० दिवसांत उत्तमप्रकारे पिकतात. सर्वसाधारणपणे फळे देठाकडून कोयीकडे, तर कोयीकडून सालीकडे अशा पद्धतीने आंबा पिकतो. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने पिकलेल्या आंब्यामध्ये काही ठिकाणी देठाच्या विरुद्ध भागास (चोचीकडे) आंबा थोडासा आंबट असतो. आंब्याच्या न पिकलेल्या फळांच्या अढीत काही पक्व फळे ठेवल्यास पिकण्याची क्रिया लवकर सुरू होते.
ओळखा कॅल्शिअम कार्बाईडने पिकवलेली फळे
कॅल्शिअम कार्बाईडने पिकवलेली फळे ही घट्ट व आकर्षक रंगाची असली तरी आंब्याच्या विशिष्ट जातीचा गंध, सुवास अजिबात येत नाही. फळामध्ये योग्य ती पिकवण प्रक्रिया न झाल्यामुळे फळे चवीस आंबट किंवा चवहीन असतात. तसेच आतून काळसर रंग आणि विचित्र स्वाद असलेली असतात. याउलट इथिलीन किंवा इथिलीन वायूशी निगडित रसायनामुळे फिकणारी फळे ही पिकल्यानंतर थोडी मऊ असतात. तसेच या फळांना विशिष्ट सुवास प्राप्त झालेला असतो. फळे कापल्यानंतर गर पिवळा किंवा केशरी रंगाचा असतो.
रसायनाने पिकविलेले आंबे खाल्ल्याने पोटाच्या विकारांसह कर्करोगासारखे गंभीर आजारही बळावण्याची शक्यता आहे. रसायनात पिकविलेल्या आंब्यांमुळे लहान मुलांच्या पोटात दुखणे, मळमळ होणे, चक्कर येणे, उलटी होणे आदी आजारांचे लक्षण निदर्शनास येतात. तसेच याचे आरोग्यावर विपरित परिणाम जाणवतात.
- डॉ. अनिल कावरखे
वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम