वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात असणार केमोथेरपीची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 03:37 PM2019-08-10T15:37:22+5:302019-08-10T15:37:47+5:30
वाशिम जिल्ह्यातील कर्करोगग्रस्त रुग्णांना मोठा आधार मिळणार असून, त्यांचा इतर जिल्ह्यात खर्च करून उपचारासाठी जाण्याचा त्रास दूर होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यशासनाने वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात केमोथेरपी युनिटकरीता आवश्यक असलेल्या उपकरणांची खरेदी करण्यासाठी सहसंचालक, आरोग्य सेवा (असंसर्गजन्य रोग), मुंबई यांच्या प्रस्तावानुसार ३ लाख ४० हजार ३३५ रुपये खर्चास मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कर्करोगग्रस्त रुग्णांना उपचारासाठी मोठा आधार होणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील मंजूर कृती आराखडयामध्ये कर्करोग, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि स्ट्रोकच्या प्रतिबंध आणि नियंत्रण (एनपीसीडीसीएस) या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत ६५ लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. या अनुदानातून राज्यातील २१ जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी युनिटसाठी लागणाºया उपकरणांची खरेदी करण्याकरीता अंदाजित ६४.९७ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतचा प्रस्ताव सहसंचालक, आरोग्य सेवा (असंंसर्गजन्य रोग), मुंबई यांनी शासनास सादर केला आहे. सदर खरेदी प्रस्तावास आयुक्त (आरोग्य सेवा) तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांनी मान्यता दिलेली आहे. या २१ जिल्हा सामान्य रुग्णालयात वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाचाही समावेश असून, शासन निर्णयानुसार वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात केमोथेरपी युनिसाठी सायटोटॉक्सिक कॅबिनेटसाठी २ लाख ६२ हजार ३३५ रुपये, तर इन्फ्युजन पंपसाठी ३० हजार आणि पल्स आॅक्सीमीटरसाठी १८ हजार रुपये, असे एकूण ३ लाख ४० हजार ३३५ रुपये खर्चास मंजूरी मिळाली आहे. आता प्रत्यक्षात हा निधी होण्यासाठी सदर उपकरणांची आवश्यक, मागणी यांची शहानिशा किंवा खातरजमा केली जाणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून केमोथेरपी युनिट स्थापित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे वाशिम जिल्ह्यातील कर्करोगग्रस्त रुग्णांना मोठा आधार मिळणार असून, त्यांचा इतर जिल्ह्यात खर्च करून उपचारासाठी जाण्याचा त्रास दूर होणार आहे.