वाशिमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला स्वच्छतेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 05:49 PM2018-07-31T17:49:44+5:302018-07-31T17:50:22+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी ३१ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विभाग प्रमुखांची समन्वय सभा घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) ग्रामीण भागात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी ३१ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विभाग प्रमुखांची समन्वय सभा घेतली. यावेळी स्वच्छ सर्वेक्षणासाठी सज्ज राहण्याच्या सूचना मीणा यांनी दिल्या.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात १ आॅगस्ट ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वात जास्त गूण मिळविणाºया जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावर २ आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्या दृष्टिने जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये तयारी करण्यात यावी, प्रत्येक विभागाने एकमेकांशी समन्वय साधून यामध्ये चांगले काम करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना मीणा यांनी विभाग प्रमुखांसह गटविकास अधिकाºयांना दिल्या. ग्रामपंचायत स्तरावरील शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, मंदिर, यात्रा स्थळे तसेच सार्वजनिक ठिकाणे आदींची स्वच्छतेसंदर्भात पाहणी केली जाणार आहे. यामध्ये शौचालय सुविधा, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन, पिण्याचे पाण्याचे नियोजन आदींना प्राधान्य देण्यात येणार आहे. सर्वेक्षणादरम्यान उपरोक्त बाबींची प्राधान्यक्रमाने तपासणी होणार असून, स्वच्छतेबाबत व स्वच्छ भारत मिशनसंदर्भात नागरिकांच्या प्रतिक्रियादेखील जाणून घेतल्या जाणार आहेत. हगणदरीमुक्त ग्रामपंचायत पडताळणी, नादुरूस्त शौचालय प्रगती, छायाचित्र अपलोड आदी बाबींचा समावेशही सर्वेक्षणाच्या गुणांकनात करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करण्याच्या सूचना मीणा यांनी दिल्या. विभाग प्रमुखांनी समन्वय साधून स्वच्छ सर्वेक्षणसंदर्भात उत्कृष्ट कामगिरी करून देशपातळीवर वाशिम जिल्ह्याचे नाव उंचाविण्यासाठी कामाला लागावे, अशा सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, नितीन माने, सुदाम इस्कापे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी. गहेरवार यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.