मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली - विजय वडेट्टीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 04:10 PM2019-05-15T16:10:21+5:302019-05-15T16:11:14+5:30
मुख्यमंत्र्यांनी जिल्हयातील मोजक्याच सरपंचाशी चर्चा करुन दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसले असल्याचा आरोप विधानसभेचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी वाशिम येथे १५ मे रोजी पत्रकार परिषदेत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम जिल्हयामध्ये अतिशय तीव्र स्वरुपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून या दुष्काळाच्या दहाकतेमुळे मानव व प्राण्याबरोबरच इतर सजीवांना देखील जगणे कठीण झाले आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्री महोदय ठोस उपाययोजना करण्याऐवजी आचारसंहितेचे कारण दाखवित नागरिकांच्या दुष्काळी समस्याकडे दुर्लक्ष केले आहे. केवळ कॉम्फरंसव्दारे जिल्हयातील मोजक्याच सरपंचाशी चर्चा करुन जिल्हयातील दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसले असल्याचा आरोप विधानसभेचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी वाशिम येथे १५ मे रोजी पत्रकार परिषदेत केला.
तसेच शासनाने जलयुक्त शिवाराच्या नावावर मोठ्या प्रमाणात काम केल्याचा गाजावाजा करुन महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याच्या घोषणा हवेत विरल्या आहेत. महाराष्ट्रातील बहुतांश गावामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दुष्काळी मदत मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रांताध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी प्रत्येक विभागात समिती तयार केली आहे. आपल्या विदर्भ विभागासाठी या समितीमध्ये माझ्यासह माजी मंत्री वसंतराव पुरके , आम. रणजित कांबळे, आ. विरेंद्र जगताप, राजेंद्र मुळक, अमित झनक, प्रवक्ते अतुल लोंढे यांचा समावेश आहे. ही समिती जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष अॅड. दिलिपराव सरनाईक व जिल्हयातील सर्व नेते सोबत घेवून वाशिम जिल्हयातील दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करुन दुष्काळाचा, दाहकता व दुष्काळाचे चटके सहन करणाºया नागरिकांच्या समस्या जाणून घेवून दुष्काळी उपाययोजना करण्यासंदर्भात शासन दरबारी मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले.
दुष्काळ उपाययोजना करण्यासाठी आमच्या मागण्यांची तत्काळ दखल घेवून तातडीने उपाययोजना करण्यासाठी ही समिती मागणी करणार असून आमच्या मागण्यांमध्ये दुष्काळग्रस्त भागांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर व प्राण्यांसाठी हौदाचे बांधकाम करुन तातडीने पाणीसाठा उपलब्ध करुन द्यावा, पाण्यासाठी विहीर व टयूबवेल अधिग्रहण करुन त्या अधिग्रहीत केलेल्या विहीरींचा तात्काळ मोबदला मिळवून द्यावा, अद्यापपर्यंत न मिळालेली पीकविम्याची रक्कम तत्काळ द्यावी. रोजगार हमी योजने अंतर्गत धरणे, शेततळे, नदी खोलीकरण, सिमेंट बांध या माध्यमातून मजुरांना रोजगार मिळवून द्यावा, जनावरांसाठी चारा छावण्या तातडीने सुरु कराव्या.. शासनाने जाहीर केलेली वार्षीक रुपये ६००० दुष्काळी मदत वंचीत शेतक-यांना मिळवून द्यावी. दुष्काळ भागात गहू, ज्वारी, तांदूळ यांचे उत्पादन कमी झाल्यामुळे गावातील नागरिकांना रेशन दुकानाच्या माध्यमातून धान्य मिळवून द्यावे. दुष्काळग्रस्त विभागातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ द्यावी., लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामसेवक यांची विशेष बैठक बोलावून दुष्काळ उपाययोजनेसाठी कृती आराखडा तयार करावा ,दुष्काळी भागातील शेतकºयांचे सरसकट पीककर्ज माफ करुन तात्काळ दि. ७ जून २०१९ पर्यंत पीककर्ज उपलब्ध करुन द्यावे., खत, बी-बियाणे यांच्या किमती कमी करुन शेतकºयांना मोफत मुबलक प्रमाणात खत बि-बियाणे उपलब्ध करुन द्यावे. तसेच शेतक-यांचे वीजबिल तात्काळ माफ करावे. शासनाने जाहीर केलेले तुरीचे रुपये १००० चे अनुदान तात्काळ देण्यात यावे. दुष्काळी भागातील निराधार व वृध्दापकाळ योजनांची अंमलबजावणी करणेबाबत.. वाशिम शहरात तीव्र पाणी टंचाई असल्यामुळे १२ दिवसात १ वेळा नळ येतात ते दररोज यावे यासाठी तात्काळ अंमलबजावणी करावे.या मागण्याचा समावेश आहे.
सदर मागण्यांची तात्काळ दखल घेवून दुष्काळी भागामध्ये ताबडतोब उपाययोजना कराव्यात व दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी समिती सदस्यांसह ईश्वा राठोउ सरपंच, वाय.के.इंगोले, अॅड.पी.पी.अंभोरे, अबरार मिर्झा, डॉ.विशाल सोमटकर, माणिक भगत, विरेंद्र देशमुख, दादाराव देशमुख, दिलीपराव देशमुख, पंचायत समिती सदस्या गजानन भोने, परशरामजी भोयर, गजानन गोटे, रमेश पाचपिल्ले, शशिकांत टनमने, किसनराव घुगे, संदीप घुगे, मोहन इंगोले, सुरेश शिंदे, मिलींद पाकधने, राजेश जाधव, दिलीप भोजराज, वामनराव मारोती अगवे, रमेश लांडकर, फारुक अली, प्रा.संतोष दिवटे, राजु घोडीवाले, सुधीर गोळे, गजानन बाजड सरपंच नावली, कुंडलीकराव वानखेडे यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.