पोहरादेवी तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी १०० कोटी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 06:26 PM2018-12-03T18:26:32+5:302018-12-03T18:30:04+5:30
वाशिम : देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी आणखी १०० कोटी रुपयांच्या निधी देण्यात येईल. तसेच बंजारा समाजाची संस्कृती जपण्यासाठी बंजारा अकादमी उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरादेवी ता. मानोरा येथे सोमवारी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी आणखी १०० कोटी रुपयांच्या निधी देण्यात येईल. तसेच बंजारा समाजाची संस्कृती जपण्यासाठी बंजारा अकादमी उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरादेवी ता. मानोरा येथे सोमवारी केली.
पोहरादेवी विकास आराखड्यातील नंगारारुपी वास्तूसंग्रहालयाच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संत रामराव महाराज, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संजय राठोड, सहपालकमंत्री मदन येरावार, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासह खासदार, आमदार व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
सुरूवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंजारा समाजाचं पारंपारिक वाद्य नगाºयाच वादन केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सेवालाल महाराज यांनी समाजाला दिशा देण्यासोबतच लढवैय्येपणाची शिकवण दिली. अशा महान व्यक्तिच्या समाधीस्थळाचा विकास करणे ही राज्य शासनाची अग्रकमाची जबाबदारी आहे. सेवालाल महाराजांची जयंती आता शासनस्तरावर साजरी करण्यात येत आहे. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव होण्यासाठी हे जागतिक दर्जाचे स्मारक असेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या स्मारकासाठी २५ कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उर्वरित १०० कोटी रुपयांचा निधीसुद्धा लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच पोहरादेवीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
बंजारा समाजाची संस्कृती जपण्यासाठी बंजारा अकादमी स्थापन करण्यात येईल. जिल्ह्यातील विविध महामार्गांसोबतच पोहरादेवी येथून समृद्धी महामार्ग जाणार आहे. त्यासोबतच वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गावर पोहरादेवी येथे स्थानक देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, बंजारा समाजाच्या मागण्यांबाबत आपण सहमत असल्याचे सांगितले. संत सेवालाल महाराजांनी चांगल्या वैचारिक शिकवणीसह लढाऊ वृत्तीचे दर्शन घडविले. पोहरादेवी येथील स्मारकामध्ये जगातून पर्यटक यावेत. संत सेवालाल महाराजांची शिकवण जगभर पोहचावी, यासाठी हे स्मारक उभे राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले. पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संजय चव्हाण, सोमेश्वर पुसदकर, रविंद्र पवार आणि प्रा. राजेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. टी. सी. राठोड यांनी आभार मानले.