शिक्षक दिनी मुख्यमंत्र्यांनी साधला जिल्ह्यातील शिक्षकांशी संवाद
By संतोष वानखडे | Published: September 5, 2022 06:02 PM2022-09-05T18:02:32+5:302022-09-05T18:03:40+5:30
शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ सप्टेंबर रोजी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून जिल्हयातील शिक्षकांशी संवाद साधला.
वाशिम : शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ सप्टेंबर रोजी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून जिल्हयातील शिक्षकांशी संवाद साधला. जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळेचे सहायक शिक्षक राजू महल्ले, वाशिमच्या बाकलीवाल विद्यालयाचे कला शिक्षक अमोल काळे आणि वाशिमच्या राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी या शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) संजय जोल्हे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, आकाश आहाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षकांनी आजच्या संवादातून जे प्रश्न उपस्थित केले आणि ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, त्या निश्चितपणे सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यशस्वी जीवनात शिक्षकांचे स्थान आगळे वेगळे आहे. आई-वडीलांसह आपल्याला घडविण्यात शिक्षकांचा मोठा वाटा आहे. ज्ञानदानाची शिक्षकांची भूमिका आजही कायम असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. वाशिम येथून मुख्यमंत्र्यांशी शिक्षक दिनानिमित्त आयोजित संवाद कार्यक्रमामध्ये शिक्षक संभाजी साळसुंदर, केंद्र प्रमुख इंदिरा राणे, शरद सुरशे, सुनिल ठाकरे, नारायण गारडे, शैलेश मवाळ, रणजीत जाधव, देविदास वानखेडे, मित्रचंद वाटकर व कारंजा येथील प्रशांत गंधक आदी शिक्षक सहभागी झाले होते.
सरकारी शाळांसाठी प्रोत्साहनपर योजना सुरू कराव्या
शिक्षक महल्ले यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना, सध्याच्या कॉन्व्हेंट संस्कृतीमध्ये मातृभाषेतून, मराठीतून शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या व नगर परिषदेच्या शाळांना शासनाकडून बदलत्या काळानुसार काही प्रोत्साहनपर योजना सुरू करता येतील काय, जेणेकरून मराठी भाषा समृद्ध होण्यास मदत होईल व या शाळा टिकून राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली. कला शिक्षक काळे यांनी कला विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन असल्याचे सांगत कला विषयाचे महत्व वाढविण्यासाठी काही उपाययोजना कराव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कुळकर्णी यांनी ग्रामीण भागामध्ये विशेषतः आर्थिक परिस्थिती कमजोर असलेल्या पालकांमध्ये मुलींच्या शिक्षणाबाबतची उदासीनता दिसून येते. अशा कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी काही उपाययोजना करण्यात याव्या, असे त्यांनी सुचविले.