मुख्यमंत्री ग्रामसडक योजना : पश्चिम वऱ्हाडातील ४६ रस्त्यांची होणार ‘दर्जोन्नती’ !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 07:11 PM2018-11-15T19:11:49+5:302018-11-15T19:13:30+5:30
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पश्चिम वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांतील ४६ रस्त्यांची दर्जोन्नती केली जाणार असून, यासाठी १३९ कोटी १९ लाख रुपयांच्या अंदाजित रकमेच्या कामांना ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यताही दिली आहे.
वाशिम - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पश्चिम वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांतील ४६ रस्त्यांची दर्जोन्नती केली जाणार असून, यासाठी १३९ कोटी १९ लाख रुपयांच्या अंदाजित रकमेच्या कामांना ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यताही दिली आहे. आवश्यक ते प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर तांत्रिक मान्यता मिळण्याची आता प्रतीक्षा लागून आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी निधी पुरविला जातो. सन २०१८-१९ या वर्षात पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात विविध टप्प्यात रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेची कार्यवाही सुरू असून, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बॅच - ४ या अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील एकूण १३ कामांना ९ आॅक्टोबर रोजी ग्रामविकास विभागाची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. आता तांत्रिक मान्यतेसाठी आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे. या १३ कामांमध्ये वाशिम तालुक्यातील पाच, कारंजा तालुक्यातील चार, रिसोड व मालेगाव तालुक्यातील प्रत्येकी दोन रस्ते कामांचा समावेश आहे.
या १३ कामांवर २८ कोटी २८ लाख १७ हजार रुपयांचा खर्च होईल, असा अंदाज बांधण्यात आला आहे. याप्रमाणेच अकोला व बुलडाणा जिल्ह्यातही काही रस्त्यांची दर्जोन्नती केली जाणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत संशोधन व विकास अंतर्गत अकोला जिल्ह्यातील एकूण १७ कामांच्या ७९ कोटी २० लाख ६८ हजार रुपयांच्या कामांनाहीप्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. मु्ख्यमंत्री ग्रामसडक योजना सन २०१८-१९ या वित्तीय वर्षात बॅच -२ अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील १६ रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी ३१ कोटी ७१ लाख २२ हजार रुपयांच्या अंदाजित रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असून, आता तांत्रिक मान्यतेची प्रतिक्षा आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सन २०१८-१९ या वर्षातील बॅच - चार अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील रस्त्यांच्या दर्जोन्नतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. संबंधित यंत्रणेद्वार तांत्रिक मान्यतेची कार्यवाही केली जात आहे.
-व्ही.बी. गहेरवार
कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग
जिल्हा परिषद वाशिम.