मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलांच्या चाव्या सुपुर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:53 AM2021-06-16T04:53:33+5:302021-06-16T04:53:33+5:30
वाशिम : राज्यात ग्रामीण गृहनिर्माणाला गती देण्यासाठी राबविण्यात आलेल्या महाआवास अभियान (ग्रामीण) अंतर्गत पूर्ण झालेल्या सुमारे तीन लाख २२ ...
वाशिम : राज्यात ग्रामीण गृहनिर्माणाला गती देण्यासाठी राबविण्यात आलेल्या महाआवास अभियान (ग्रामीण) अंतर्गत पूर्ण झालेल्या सुमारे तीन लाख २२ हजार घरकुलांच्या लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश सोहळा १५ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घराच्या चाव्या सुपुर्द करून पार पडला. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या सोहळ्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील सहा घरकुल लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या सुपुर्द करण्यात आल्या.
वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, समाजकल्याण समितीचे सभापती वनिता देवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक डॉ. विनोद वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हास्तरावर प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी दिगांबर सावके (शेलू खु., ता. वाशिम), रामदास खंडरे (मंगळसा, ता. मंगरूळपीर), अनुसया ठाकूर (चांडस, ता. मालेगाव), रमाई आवास योजनेचे लाभार्थी सुधाकर खडसे (ब्राह्मणवाडा, ता. वाशिम), गजानन खिराडे (मंगळसा, ता. मंगरूळपीर), जनार्धन चंद्रशेखर (भेरा, ता. मालेगाव) या लाभार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या सुपुर्द करण्यात आल्या. पंचायत समिती स्तरावरसुद्धा गृहप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यातील ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत राज्यात महा आवास अभियान (ग्रामीण) राबविण्यात आले. या योजनांमध्ये केंद्र व राज्य शासनपुरस्कृत आवास योजनांची गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आपले स्वतःचे घर असावे, हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. आवास योजनांच्या माध्यमातून राज्यात सुमारे ३ लक्ष २२ हजार कुटुंबांचे हे स्वप्न सत्यात आले आहे. ज्या व्यक्तींकडे घरासाठी स्वतःच्या मालकीची जमीन नाही, अशा लाभार्थ्यांना घरासाठी जमीनही उपलब्ध करून देण्यात आली. कोरोना संसर्गाच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घरकुलांचे काम पूर्ण झाले, हे कौतुकास्पद असल्याचे यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तसेच मंगळवारी गृहप्रवेश केलेल्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या; तसेच आपले घर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले. स्वतःचे पक्के घर झाल्याचे समाधान आहे; तसेच पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण झाले, अशा प्रतिक्रिया यावेळी लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या.