मुख्यमंत्र्यांचा गुंठेवारीबाबतचा निर्णय वाशिमकरांच्या हिताचा ; गुंठेवारीधारक आनंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:09+5:302021-07-07T04:51:09+5:30
खासदार गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ३ जानेवारी व २६ जानेवारी रोजी पालकमंत्री शंभुराज देसाई यांना निवेदन देऊन ...
खासदार गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ३ जानेवारी व २६ जानेवारी रोजी पालकमंत्री शंभुराज देसाई यांना निवेदन देऊन गुंठेवारीबाबत चर्चा केली होती. त्यावरून शासनाने दखल घेत पुढील कार्यवाहीचा निर्णय घेऊन वाशिम नगर परिषदेने गुंठेवारी नियमित करण्याचे प्रस्ताव नागरिकांना सादर करण्याचे सांगितले आहे. गुंठेवारी नियमित करण्याकरिता ५ जुलै ते ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून नागरिकांनी आपले प्रस्ताव न.प.कडे सादर करावे असे आवाहन गवळी यांनी केले आहे. राज्यात सर्वत्र गुंठेवारी खरेदीचे व्यवहार सुरू असताना मात्र वाशिम नगर परिषद क्षेत्रात ८ ते ९ वर्षापासून गुंठेवारी नियमित करण्याची कार्यवाही बंद ठेवण्यात आली होती. काही मंडळी आपल्या स्वार्थासाठी प्रशासनाची दिशाभूल करून नगर परिषद क्षेत्रातील गुंठेवारी नियमित करण्यासाठी अडथळे आणत होती. त्यामुळे जनतेचे मोठे नुकसान झाले असून शासनाचे सुद्धा आर्थिक नुकसान झाले आहे. गुंठेवारी नियमित करण्याची कार्यवाही सुरू झाल्याने आता लोकांचे कर्ज घेऊन घर बांधण्याचे स्वप्न व घरकूल व इतर शासनाच्या योजनेचा लाभ नागरिकांना कोणत्याही अडथळ्याविना मिळणार आहे. त्यामुळे गुंठेवारी धारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
-------------
काही वर्षापूर्वी वाशिम नगर परिषदेने वेगवेगळ्या दैनिकांमधून गुंठेवारी नियमानुकूल करण्याकरिता असेच प्रस्ताव बोलविले होते. परंतु अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे नागरिकांचे खूप आर्थिक नुकसान झालेले आहे. न.प. प्रशासनाने यावेळी आलेल्या अर्जावर व प्रस्तावावर तातडीने निर्णय घ्यावा तसेच न.प.मध्ये येणाऱ्या नागरिकांना गुंठेवारीबद्दल योग्य रित्या समजून सांगावे. प्रस्तावावर तातडीने निर्णय न घेतल्यास, प्रस्ताव प्रलंबित ठेवल्यास,नागरिकांना काही त्रास झाल्यास न.प. प्रशासनाचे अधिकारी जबाबदार राहतील.
खा. भावनाताई गवळी , यवतमाळ, वाशिम मतदारसंघ
------------
चौकट
गुंठेवारीच्या कागदपत्रांकरिता व माहितीकरिता संपर्क साधा
गुंठेवारी नियमानुकूल करण्याकरिता आवश्यक कागदपत्रांची यादी व नमुने वाशिम शहर शिवसेना व युवा सेनेतर्फे पाटणी चौक वाशिम येथे ६ जुलै ते १६ जुलै पर्यंत सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत मोफत अर्ज देण्यात येतील. व १७ जुलै ते ४ ऑगस्ट पर्यंत खासदार गवळी यांचे जनसंपर्क कार्यालय,पोस्ट ऑफिस चौक वाशिम येथे देण्यात येतील. नागरिकांनी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे हस्तगत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.