वाशिम : मुख्य यातायात प्रबंधकांनी केले वाशिम स्टेशनचे निरीक्षण
By दिनेश पठाडे | Published: April 25, 2023 06:26 PM2023-04-25T18:26:20+5:302023-04-25T18:26:32+5:30
मालवाहतूक वाढविण्याबाबत केली चर्चा
वाशिम : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे मुख्य यातायात प्रबंधक जय पाटील यांनी मंगळवारी(दि.२५) रोजी वाशिम रेल्वे स्टेशनला भेट देऊन मालगाडी फलाटाच्या कामाची पाहणी केली.
वाशिम स्टेशनचा अमृत भारत स्टेशन योजनेतर्गत विकास केला जाणार आहे. त्यानुषंगाने काही कामे हाती घेतली जाणार आहेत. तत्पूर्वी मुख्य यातायात प्रबंधकांचा मंगळवारी स्टेशन पाहणी दौरा निश्चित झाला होता. त्यानुषंगाने जय पाटील यांनी स्टेशन परिसराची पाहणी करुन आवश्यक त्या सूचना सर्वसंबंधितांना यावेळी दिल्या. तसेच मालगाडीतून वाहतूक केल्या जाणाऱ्या मालाची देखील पाहणी केली. वाशिम रेल्वे स्थानकावरून अधिकाधिक मालवाहतूक करण्याच्या दृष्टीने त्यांनी कंपनी मालकांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी मुख्य यातायत निरीक्षक सौरभ द्विवेदी, मुख्य वाणिज्य निरीक्षक प्रवीण पवार, वाशिम विभागाचे वाहतूक निरीक्षक उजवे, स्टेशन अधीक्षक राम भजन मीना, माल अधीक्षक अजय कुमार आदींची उपस्थिती होती.
नवीन गाड्यांसह थांब्याची वेळ वाढवा
पूर्णा-अकोला मार्गावरून नव्याने काही गाड्या सुरु कराव्यात आणि चालू गाड्यांना वाशिम स्थानकावर केवळ १ मिनिट थांबा दिला जात आहे. त्यात वाढ करुन २ मिनिट थांबा करावा अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी डीआरयुसीसीचे सदस्य महेंद्रसिंग गुलाटी यांच्यासह इतरांनी निवेदन मागण्यांचे निवेदन यातायात प्रबंधक जय पाटील यांना दिले.