रिसोड तालुक्यात मुलीचा बालविवाह रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 12:36 PM2020-06-02T12:36:57+5:302020-06-02T12:37:04+5:30
‘चाईल्ड लाईन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष संतराम राठोड यांना या बाल विवाहाविषयी माहिती मिळाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे रिसोड तालुक्यातील चिंचाबा भर येथील अल्पवयीन बालिकेचा ५ जून रोजी होणारा नियोजित विवाह १ जून रोजी रोखण्यात आला. ‘चाईल्ड लाईन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष संतराम राठोड यांना या बाल विवाहाविषयी माहिती मिळाली होती.
रिसोड तालुल्यातील चिंचाबा भर येथील एका १६ वर्षीय मुलीचा ५ जून २०२० रोजी विवाह होणार असल्याची माहिती ‘चाईल्ड लाईन’च्या माध्यमातून महिला व बालविकास विभागाला मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने राठोड यांनी बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ. जयश्री गुट्टे, रिसोडचे पोलीस निरीक्षक संतोष नेमनार, बीट जमादार अनिल कातडे, पोलीस कॉन्स्टेबल सतिश मुसळे, ‘चाईल्ड लाईन’ वाशिमचे महेश राऊत, बालविवाह प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामसेवक इंगळे, रिसोड तालुका कनिष्ठ संरक्षण अधिकारी घुगे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी लक्ष्मी एस. काळे, कायदा तथा परीविक्षा अधिकारी जिनसाजी एम चौधरी, सामाजिक कार्यकर्ता अनंता पी. इंगळे यांच्याशी संपर्क करून बालविवाह रोखण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत कळविले. त्यानुसार १ जून रोजी बालविवाह रोखण्याची कार्यवाही करण्यात आली.
अल्पवयीन मुलीचे वडील व कुटुंबियांचे समुपदेशन
महिला व बाल विकास विभागाचे सर्व अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांसह चिंचाबा भर येथे जावून पोलीस पाटील व अल्पवयीन मुलीचे वडील व कुटुंबियांचे समुपदेशन केले. तसेच त्यांच्याकडून बाल विवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत हमीपत्र लिहून घेतले. गावपरिसरात कुठेही बालविवाह होत असल्याचे माहिती देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
वाशिम जिल्ह्यात बालविवाह रोखण्याची कार्यवाही महिला व बालविकास विभागातर्फे केली जात आहे.वर्षभराच्या कालावधीत जवळपास ८ ते ९ बालविवाह रोखण्यात आले.
- सुभाष राठोड,
बालविकास अधिकारी, वाशिम