‘चिटींग’ करणारे विद्यार्थी प्रशासनाच्या ‘रडार’वर!
By admin | Published: March 3, 2017 12:49 AM2017-03-03T00:49:57+5:302017-03-03T00:49:57+5:30
कॉपीमुक्त अभियान : शाळांनीही घेतली धास्ती
वाशिम, दि.२ - बारावी परिक्षेच्या पहिल्याच दिवशी २८ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी स्वत: परीक्षा केंद्रांवर धडक देवून इंग्रजीच्या पेपरमध्ये ‘चिटींग’ करणाऱ्या चार विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करून कॉपीमुक्त अभियानाच्या यशाची मुहूर्तमेढ रोवली. यामुळे ‘चिटींग’ करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच परीक्षा केंद्रांनीही चांगलीच धास्ती घेतली असून यंदाची परीक्षा खऱ्याअर्थाने कॉपीमुक्त होईल, असा आशावाद शिक्षणक्षेत्रात वर्तविला जात आहे.
वाशिम जिल्ह्यात ५६ परीक्षा केंद्रांवर २९ हजार २०७ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध प्रशासकीय विभागातील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात १७ भरारी पथक नेमले आहेत. केवळ ‘बोलाचाच भात अन् बोलाचीच कडी’ यानुसार कॉपीमुक्त अभियान न राबविता प्रत्यक्ष त्याची चोख अंमलबजावणी व्हावी, यासाठी दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी पहिल्याच दिवशी स्वत: पुढाकार घेत वाशिमनजिक असलेल्या काटा येथील लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयातील परीक्षा केंद्रावर धडक देवून पाहणी केली.
यावेळी या परिक्षा केंद्रावर चार विद्यार्थी नक्कल (कॉपी) करताना आढळून आल्याने तत्काळ त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यासह भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी इतर परीक्षा केंद्रांवर ‘कॉपी’ करताना आढळलेल्या तीन विद्यार्थ्यांना निलंबित केले.
‘नक्कल’च्या दिमतीवर उत्कृष्ट ‘रिझल्ट’चा ढोल पिटणाऱ्या शाळांचे धाबे दणाणले!
बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवसापासून कॉपीमुक्त अभियानाची वाशिम जिल्ह्यात धुमधडाक्यात सुरूवात झाल्यामुळे संवेदनशिल परीक्षा केंद्र तद्वतच दरवर्षी ‘नक्कल’च्या माध्यमातून उत्कृष्ट ‘रिझल्ट’ देणाऱ्या शाळांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
बोर्डाच्या यादीत जिल्ह्यातील दोन केंद्र संवेदनशिल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यातील संवेदनशिल परीक्षा केंद्रांची यादी पाठविण्यात आली असून वाशिम जिल्ह्यातील लालबहादुर शास्त्री, काटा आणि श्री शिवाजी विद्यालय, किन्हीराजा या दोन परीक्षा केंद्रांचा त्यात समावेश असून सदर केंद्रांवर शिक्षण विभागाचे विशेष लक्ष आहे.
कॉपीमुक्त अभियानांतर्गत नेमण्यात आलेल्या भरारी पथकांची कॉपीबहाद्दरांवर करडी नजर राहणार आहे. कॉपी करताना आढळून येणाऱ्या विद्यार्थ्यास तडकाफडकी निलंबित केले जाणार आहे. त्यामुळे कुणीही परीक्षेत ‘चिटींग’ करण्याचा प्रयत्न करू नये.
- आर.डी.तुरणकर
माध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिम