जीर्ण झालेल्या पुरातन वेसी कोसळण्याचा धोका बळावला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 03:31 PM2019-07-07T15:31:12+5:302019-07-07T15:31:33+5:30
हा ऐतिहासीक ठेवा जपून ठेवण्याकडे मात्र स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून जीर्ण झालेल्या वेसी पावसामुळे कधीही कोसळण्याचा धोका बळावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राजे वाकाटकांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुर्वीच्या वत्सगुल्म आणि आताच्या वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी परकीय शत्रूंपासून रक्षणाच्या हेतूने टोलेजंग स्वरूपातील वेसी उभारण्यात आल्या होत्या. हा ऐतिहासीक ठेवा जपून ठेवण्याकडे मात्र स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून जीर्ण झालेल्या वेसी पावसामुळे कधीही कोसळण्याचा धोका बळावला आहे.
पुर्वीच्या काळात संपूर्ण गाव बंद करण्यासाठी चारही दिशांनी दरवाजे असलेल्या वेसी उभारल्या जायच्या. त्यानुसार, साधारणत: ४०० वर्षांपूर्वी जिल्ह्यातील कारंजा लाड येथे दारव्हा वेस, दिल्ली वेस, पोहा वेस आणि मंगरूळ वेस उभारल्या गेली. तद्वतच वाशिम शहरातही काटीवेस, चंडिका वेस, मंगळवारी वेस आणि माहुरवेस अशा चार वेसी उभारण्यात आल्या होत्या. सदर वेसी नेमक्या कुणी बांधल्या, याची सुस्पष्ट माहिती कुणालाही नाही; परंतु परकीय शत्रूंपासून गावांचे रक्षण व्हावे, या हेतूने त्या सुमारे ४०० वर्षांपूर्वी बांधल्या गेल्या असे जुणे जाणकार सांगतात. कारंजा येथील मंगरूळ वेसीच्या डागडुजीचे काम गतवर्षी नगर परिषदेकडून करण्यात आले; परंतु उर्वरित तीन वेसींच्या डागडुजीचा प्रश्न प्रलंबित असून त्यातील दारव्हा आणि दिल्ली या वेसी कोसळण्याच्या अवस्थेत पोहचल्या आहेत. वाशिम येथील तीन वेसी नामशेष झाल्या असून माहुरवेसची पडझड झाली आहे.
जीर्ण वेसींखालूनच होतेय वाहतूक
पुर्वी कारंजा आणि वाशिम ही दोन्ही शहरे वेसींच्या आत वसलेली होती. कालांतराने मात्र दोन्ही शहरे वेसींच्या बाहेर दुरपर्यंत विस्तारत गेली. दरम्यान, वाशिममध्ये आपले अस्तित्व टिकवून असलेल्या एकमेव माहुरवेस परिसरात घरे वसलेली असून कारंजा येथे असलेल्या चारही वेसींखालून दैनंदिन वाहतूक सुरू असते. अशा स्थितीत जीर्णावस्थेतील वेसी कोसळल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कारंजा लाड येथे असलेल्या चारही वेसींच्या पुनरूज्जीवनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नगर परिषदेने सर्वंकष प्रयत्न चालविले आहेत. त्यानुषंगाने गतवर्षी १.२२ कोटी रुपये खर्चून दिल्ली वेसीचे पुनरूज्जीवन करण्यात आले; तर १.७६ कोटी रुपये मंजूर असलेल्या दारव्हा वेसीचे काम सुरू आहे. उर्वरित दोन वेसींच्या पुनरूज्जीवनाचा प्रश्नही लवकरच निकाली काढला जाईल.
- डॉ. अजय कुरवाडे
मुख्याधिकारी, नगर परिषद, कारंजा
वाशिम शहरातील पुरातन माहुरवेस पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे नगर परिषदेकडून डागडूजी करण्यापूर्वी त्यास मंजूरी मिळण्यासंदर्भातील प्रस्ताव पुरातत्व विभागाकडे पाठविलेला आहे. प्रस्तावाला अद्यापपर्यंत मंजूरी मिळाली नसल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे.
- वसंत इंगोले
मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम