घरकुलासाठी नागरिक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 01:54 PM2020-01-24T13:54:25+5:302020-01-24T13:54:30+5:30
घरकुलाचा लाभ मिळण्याच्या मागणीसाठी २३ जानेवारी रोजी लाभार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपल्या व्यथा मांडल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राहायला घर नाही, जागेचा आठ अ नमुन्यावर नाव नाही, त्यामुळे घरकुलापासून वंचित राहण्याची वेळ वाशिम तालुक्यातील सुकळी परिसरातील शेकडो लाभार्थींवर आली आहे. जागेचा आठ अ तसेच घरकुलाचा लाभ मिळण्याच्या मागणीसाठी २३ जानेवारी रोजी लाभार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपल्या व्यथा मांडल्या.
निवासी प्रयोजनार्थ इ-क्लास तसेच गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्यास, सदर अतिक्रमण नियमानुकूल होणे अपेक्षीत आहे. सुकळी परिसरातील शेकडो लाभार्थी निवासी प्रयोजनार्थ गायरान जमिनीवर राहत आहेत. परंतू, अद्याप जागेच्या आठ अ नमुन्यावर लाभार्थींचे नाव नाही. या नमुन्यावर ‘शासन’ असे नमूद आहे. त्यामुळे घरकुलाच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ या लाभार्थींवर आली आहे. सन १९९० पासून गायरान जमिनीवर निवास करून राहत असून, जागेचा आठ अ नावावर झाला नसल्याने लाभार्थींमधून रोष व्यक्त होत आहे. आठ अ नमुन्यावर नावाचा उल्लेख करण्याच्या मागणीसाठी यापूर्वी अनेकवेळा जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला; परंतू न्याय मिळाला नाही असा आरोप या लाभार्थींना केला.
याप्रकरणी विद्यमान जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी लाभार्थींनी २३ जानेवारी रोजी केली. घरकुलाचा लाभ न मिळाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लाभार्थींनी दिला.