कारंजात "स्वाईन फ्लू"सदृश आजाराने नागरिक भयभीत !
By admin | Published: April 3, 2017 01:28 PM2017-04-03T13:28:22+5:302017-04-03T13:28:22+5:30
कारंजा शहरात सध्या "स्वाईन फ्लू" सदृश आजाराची दहशत पसरली आहे.
संशयित दगावला: तिघांवर उपचार
कारंजा : शहरातील चार नागरीकांना "स्वाईन फ्लू" सदृश आजाराने ग्रासल्याची चर्चा असताना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या चौघांपैकी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवार २ एप्रिल रोजी समोर आली. संजय रामपाल कडेल असे मृतक युवकाचे नाव असून दगावलेला रुग्णासह इतर उपचार सुरु असलेल्या तिघांना स्वाईन फ्लू आजार असल्याची माहिती आहे. कारंजा शहरात सध्या "स्वाईन फ्लू" सदृश आजाराची दहशत पसरली आहे.
शहरातील कडेल कुटूंबातील तिघांना व अन्य एकास शुक्रवार ३१ मार्च पासून खोकल्याचा त्रास जाणवू लागला. त्यांना शहरातील डॉ.अजय कांत यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोन महिलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. तर संजय कडेल या युवकाच्या आजाराचे निदान होत नसल्याने अधिक तपासण्या करुन उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. दरम्यान, अकोला येथील ओझोन रुग्णालयात उपचार सुरु असताना या रुग्णाचा मृत्यू झाला. तर चोकसे नामक युवकाला डॉ.कांत यांनी पुढील उपचाराकरीता यवतमाळ येथे हलविण्याचा सल्ला दिला.