नागरिकांनो घ्या खबरदारी, पालिकेने उचलली ‘बाप्पां’च्या विसर्जनाची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:49 AM2021-09-17T04:49:03+5:302021-09-17T04:49:03+5:30
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यास प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. यासह खबरदारी ...
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यास प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. यासह खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे प्रशासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. अशा स्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये, या हेतूने स्थानिक नगर परिषदेकडून ‘श्रीं’च्या मूर्ती विसर्जनाची जबाबदारी उचलण्यात आली. त्यानुषंगाने शहरात २५ स्थळे निश्चित करण्यात आली असून ‘ट्रॅक्टर ट्राली’व्दारे मूर्ती संकलन करून देवतलावात विसर्जन करण्यासंबंधीचे नियोजन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसापासून वाशिम शहरात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट बहुतांशी निवळले आहे; मात्र पूर्णत: संपुष्टात आलेले नाही. त्यामुळे संसर्गाचा धोका बळावण्याची शक्यता गृहीत धरून गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. त्याचे संपूर्ण जिल्ह्यात पालन केले जात आहे. दरम्यान, येत्या रविवार, १९ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाचा मुहूर्त असून शहरवासीयांच्या सोयीसाठी नगर परिषदेने गणेशमूर्तीच्या विसर्जनाची जबाबदारी घेतली आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी ८ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आलेल्या २५ स्थळांवर उभ्या करण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रालीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून नागरिकांनी त्यांच्या घरी स्थापित गणेशमूर्ति आणून द्याव्या, त्याचे विसर्जन देवतलावात करण्यात येईल. नागरिकांनी या कामी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अशोक हेडा व मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी केले आहे.
.................
या २५ स्थळांवर होणार मूर्ती संकलन
नवीन रिसोड नाका (लाखाळा परिसर), श्री हनुमान मंदिर (काळेफाईल), श्री गोंदेश्र्वर (गोंदेश्र्वर पुलावर), राजस्थान महाविद्यालयासमोर, वाटाणेवाडी (अकोला रोड), डाॅ. आंबेडकर भवन, श्री गजानन महाराज चाैक (सिव्हील लाईन), पाटणी ले-आऊट, श्री महाकाली मंदिर चाैक (जुनी आययूडीपी), पुसद नाका, हिंगोली नाका, जुगलकिशोर मालपाणी यांच्या घरासमोर (इंदिरा चाैक, माहुरवेस), परळकर चाैक, राजनी चाैक, जुने बालाजी मंदिराजवळ, टिळक चाैक, श्री सावतामाळी मंदिराजवळ (चंडिकावेस), निमजगा चाैक, श्री विठ्ठल मंदिर (देवपेठ), गुरुवार बाजार, मंत्री पार्क, पाटणी चाैक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैक, नगर परिषद अग्निशमन चाैक, जुनी नगर परिषद कार्यालय चाैक.
................
कोट :
वाशिम शहरातील गणेशोत्सव राज्यभरात प्रसिद्ध आहे. १० दिवस हर्षोल्हासात हा उत्सव साजरा केल्यानंतर शेवटच्या दिवशी धुमधडाक्यात ‘श्रीं’ना भावपूर्ण निरोप दिला जातो; मात्र गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट कायम असून मानवी चुकांमुळे पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता ‘सर सलामत तो पगडी पचास’, यानुसार नागरिकांनी विसर्जनाच्या दिवशी कुठेही गर्दी करून जीव धोक्यात घालू नये. नगर परिषदेने ‘श्रीं’च्या मूर्ती विसर्जनाची जबाबदारी उचलली आहे. निश्चित केलेल्या स्थळांवर मूर्ती आणून द्यावी. त्याचे विधीवत देवतलावात विसर्जन केले जाईल.
- अशोक हेडा, नगराध्यक्ष, वाशिम