नागरिकांनो, कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात कोणतीही माहिती लपवू नका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 12:09 PM2020-07-12T12:09:10+5:302020-07-12T12:09:25+5:30
कोरोना विषाणू संसर्गाबाबतची माहिती लपवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी ११ जुलै रोजी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. कधी कधी तर जवळचे नातेवाईक सुद्धा कोरोनाबाधित व्यक्तींना दूर लोटतात. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येते. त्यामुळे कोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्या व्यक्ती आपला आजार लपवतात, तपासणीसाठी लवकर पुढे येत नसल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाने कोरोना विषाणू संसर्गाबाबतची माहिती लपवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी ११ जुलै रोजी केले.
कोरोना विषाणू संसर्गापासून होणारा कोविड-१९ हा इतर संसर्गजन्य आजारांप्रमाणेच एक आजार आहे. कोरोना संसर्ग झाला म्हणजे मृत्यूच होणार, हा गैरसमज आहे. लवकर निदान व उपचाराने कोरोना संसर्गावर मात करता येते. ज्या प्रमाणे इतर संसर्गजन्य आजार झालेली व्यक्ती बरी झाल्यानंतर त्याच्यापासून इतरांना संसर्ग होत नाही, त्याचप्रमाणे कोविड-१९ या आजारातून मुक्त झालेल्या व्यक्तीपासून सुद्धा इतरांना कोणताही संसर्ग होत नाही. त्यामुळे अशा ‘कोविड’मुक्त व्यक्तींपासून दुरावा न ठेवता, त्यांना मानसिक आधार देण्याचे आवाहनही मोडक यांनी केले. कोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्या व्यक्ती आपला आजार लपवतात, तपासणीसाठी लवकर पुढे येत नाहीत. त्रास वाढल्यानंतर, परिस्थिती अधिक बिकट झाल्यानंतरच या व्यक्ती रुग्णालयात येतात. परिणामी, या संसगार्चे निदान होण्यास विलंब होतो, डॉक्टरांना उपचारासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे कुणीही माहिती लपवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
कोरोनाबाधित रुग्णांना मानसिक आधाराची गरज
कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीला लवकरत लवकर बरे होण्यासाठी औषधोपचारासोबतच मानसिक आधाराची सुद्धा गरज असते. कोरोना संसर्ग झाला म्हणजे मृत्यू होतो, असे नाही, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. या संसर्गाचे लवकर निदान होवून उपचार घेतल्यानंतर अनेकजण या आजारावर मात करून परतले आहेत. ते सर्वजण कोरोनामुक्त जीवन जगत आहेत, समाजात वावरत आहेत. तरीही लोकांच्या मनामध्ये कोरोना संसर्गाविषयीचा गैरसमज कायम आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीकडून इतरांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. त्यामुळे कोरोनावर मात करून परतल्यानंतर समाजाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना पुन्हा नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन मोडक यांनी केले.