नागरिकांनी अनुभवला ‘द बर्निंग कार’चा थरार वाशिम येथील घटना : सुदैवाने जिवितहानी टळली
By सुनील काकडे | Published: April 22, 2023 07:04 PM2023-04-22T19:04:55+5:302023-04-22T19:05:02+5:30
रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी ‘द बर्निंग कार’चा थरार अनुभवला.
वाशिम : येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाने २२ एप्रिल रोजी दुपारी २.३५ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. क्षणातच आगीने राैद्ररूप धारण करत वाहनाचे प्रचंड नुकसान केले. वाहनातील वायरिंगमध्ये शाॅर्ट सर्किट झाल्याने वाहनाला आग लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी ‘द बर्निंग कार’चा थरार अनुभवला.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर दुपारच्या सुमारास उभ्या असलेल्या एम.एच.३७ जी ८१५९ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायरला अचानक आग लागली. पुढच्या काहीच क्षणात आगीने राैद्ररूप धारण केली. या घटनेत वाहन अर्ध्यापेक्षा अधिक जळून खाक झाले आहे.
वाशिम नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी पोहचून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन यंत्रणेचे लिडिंग फायरमन साईनाथ दिनकर सुरोशे, वाहन चालक प्रल्हाद सुरोशे, विजय कुलकर्णी, फायरमन धीरज काकडे, सागर निवळकर, अमोल लुंगे, दीपक भगत यांनी मदतकार्यासाठी पुढाकार घेतला.