मालेगाव शहरात नागरिक बिनधास्त; प्रशासन हतबल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 04:53 PM2020-08-24T16:53:04+5:302020-08-24T16:53:13+5:30
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाही, नागरिक बिनधास्त तर प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : सण, उत्सवाच्या पृष्ठभूमीवर बाजारपेठेमध्येही गर्दीचा जोर वाढला असून, गत तीन, चार दिवसात मालेगावात गर्दीने उच्चांक गाठला. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाही, नागरिक बिनधास्त तर प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांनी आता स्वत: काळजी घेण्याची गरज आहे. पण, कोरोनाची भीती आता बहुतांश नागरिकांना जणू राहिली नाही, असेच काहीचे चित्र दोन दिवसात नागरिकांच्या गर्दीवरून दिसून आले. सण, उत्सव लक्षात घेता नागरिकांची गर्दी होणे साहजिक आहे. परंतू, चेहºयाला ना मास्क; ना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विविध वस्तू व साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली. यावेळी मुख्यमार्गावरही वाहने उभी केल्याने वाहतुकीची कोंडी झाली. आॅटोचालकही चौकातच वाहने उभे करून प्रवाशांचा शोध घेत होते. गांधी चौकात तर फेरीवाल्यांनी चौकाच्या दर्शनी भागातच हातगाड्या लावल्या होत्या. त्यामुळे ये - जा करणाºयांना मोठी अडचण होत होती. या परिसरात पोलीस बंदोबस्तही नव्हता.