आधार नोंदणीसाठी नागरिकांच्या रांगा; आधार नोंदणी केंद्राचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 06:24 PM2019-08-02T18:24:15+5:302019-08-02T18:24:41+5:30
वाशिम : जिल्ह्यात आधार नोंदणी केंंद्रांचा तुटवडा असल्याने आधार नोंदणीसाठी नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात आधार नोंदणी केंंद्रांचा तुटवडा असल्याने आधार नोंदणीसाठी नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. रिसोड शहरात तर आधार नोंदणी केंद्रच नसल्याने नागरिकांना आधारपासून वंचित राहावे लागत आहे.
विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच शैक्षणिक कामांसाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. अनेक नागरिक तसेच विद्यार्थी हे आधार कार्डपासून वंचित आहेत. आधार नोंदणीसाठी जिल्ह्यात अत्यल्प नोंदणी मशिन पुरविण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेत ही सुविधा उपलब्ध केली आहे. परंतू, राष्ट्रीयकृत बँकेतदेखील आधार नोंदणीची सुविधा नियमित नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. एका महिन्यापूर्वी रिसोड शहरात आधार कार्डची नोंदणी करण्यासाठी एकमेव डाक कार्यालयात सुविधा उपलब्ध होती. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे सदर मशिन बंद पडली आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रिसोड तालुक्यात आधार कार्ड नोंदणीसाठी चार मशिन मंजूर झाल्या आहेत. सदर मशिन अद्याप कार्यान्वित करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आधार नोंदणीसाठी रिसोड तालुक्यात पूरता गोंधळ उडत आहे. अशीच परिस्थिती अन्यत्र देखील आहे.