महानगरांतून वाशिम जिल्ह्यात परतलेल्या २७ हजार नागरिकांची प्रकृती ठणठणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 02:54 PM2020-04-11T14:54:58+5:302020-04-11T14:55:06+5:30
ग्रामीण भागातील २३ हजार २०९, तर शहरी भागांतील ४ हजार नागरिकांचा समावेश होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरत असल्याने विविध कारणास्तव विदेशात, परराज्यात, महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील २७ हजार ५०९ नागरिक आपापल्या परत गावी आले आहेत. त्यात ग्रामीण भागातील २३ हजार २०९, तर शहरी भागांतील ४ हजार नागरिकांचा समावेश होता. महानगरातून परतले असल्याने कोरोना संसर्गाच्या खबरदारीसाठी त्यांना १४ दिवस घरी थांबण्याचा सल्ला देण्यात आला, तसेच त्यांची तीन वेळा आरोग्य तपासणी करण्यात आली. आता १४ दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला असून, हे सर्व नागरिक स्वस्थ असल्याने यातील एकालाही कोरोना संसर्ग झाल्याची लक्षणे दिसून आली नाहीत.
वाशिम जिल्ह्यात रोजगारांचे स्त्रोत अपुरे असल्याने प्रामुख्याने शेती कामांवरच जिल्ह्यातील बहुतांश जनतेच्या संसाराचा गाडा चालतो. त्यातही जिल्ह्यातत प्रामुख्याने कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक असल्याने खरीप हंगामानंतरच जिल्हाभरातील हजारो कामगार रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे आदी महानगरांसह गुजरात, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेशात जातात. यंदा जिल्ह्यातील २७ हजार ५०९ नागरिक विविध कामासाठी परजिल्ह्यात, परराज्यात गेले होते. ते सर्व परतले आहेत. कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाने या नागरिकांची तपासणी केली आणि १४ दिवस घरी थांबण्याचा सल्लाही दिला. या १४ दिवसांदरम्यान आरोग्य विभागाने त्यांच्यावर लक्ष ठेवत तीन वेळा तपासणी केली. तथापि, सर्वांची प्रकृती ठणठणीत असून, एकातही कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला असला तरी, कोरोना संसर्गाचा धोका संपला नसल्याने या कामगारांसह सर्वच जनतेला आवश्यक खबरदारी घेण्याच्या सुचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.