कोरोनाबाबत नागरिकांनी यापुढेही दक्ष राहावे - डॉ. मधुकर राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 05:24 PM2020-10-24T17:24:41+5:302020-10-24T17:30:30+5:30
Coronavirus कोरोनाबाबत नागरिकांनी यापुढेही दक्ष राहावे - डॉ. मधुकर राठोड
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण दक्षता घेत आहे. आॅक्टोबर महिन्यात कोरोनाचा आलेख घसरत असला तरी मृत्यूसत्र कायम आहे. हिवाळ्याच्या दिवसात कोरोनाचा विषाणू कसा प्रतिसाद देतो, यावर कोरोना विषाणू संसर्गाची तिव्रता अवलंबून आहे. कोरोनाचा धोका अजून टळलेला नसल्यामुळे नागरिकांनी सण, उत्सवादरम्यान व यापुढेही अधिक दक्ष राहावे, असा सल्ला नवनियुक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिला. शनिवारी त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते.
खासगी कोविड रुग्णालयाकडून जादा देयकाची आकारणी होते, अशा तक्रारी आहेत, याबाबत काय सांगाल?
सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार खासगी कोविड रुग्णालयांनी रुग्णांकडून देयकाची आकारणी करणे आवश्यक आहे. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाºयांनी वाशिम येथे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. यामध्ये डॉक्टरांचाही समावेश आहे. ही समिती चौकशी करीत आहे.
जिल्ह्यात आॅक्सिजन प्लांटचा अभाव आहे. याबाबत काय सांगाल?
- जिल्ह्यात आॅक्सिजन प्लांटचा अभाव असला तरी आॅक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आॅक्टोबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट येत असल्याने आॅक्सिजन बेडही मोठ्या संख्येने रिकामे आहेत. तथापि, कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता गृहित धरता जिल्ह्यात आॅक्सिजन प्लांट उभारणीबाबत जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळणार आहे. इतर जिल्ह्यात यापूर्वी उभारण्यात आलेल्या आॅक्सिजन प्लांटसंदर्भात माहिती घेतली आहे.त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. लवकरच हा प्रश्न निकाली निघेल, अशी अपेक्षा आहे.
कोरोनासंदर्भात कोणती दक्षता घ्यावी?
- आॅक्टोबर महिन्यात कोरोनाचा आलेख घसरत असल्याचे दिसून येते. परंतू धोका अजून टळलेला नाही. कोरोना विषाणू हा हिवाळ्याच्या दिवसात कसा प्रतिसाद येतो, यावर कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता अवलंबून आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचा वापर प्रत्येकाने करावा. कोरोना विषाणू संसर्गाला गांभीर्याने घेऊन यापुढेही प्रत्येकाने खबरदारी घेणे हा एकमेव उपाय आहे. केंद्र व राज्य सरकारने अंमलात आणलेल्या उपाययोजनांची वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.
कोरोनाबरोबरच अन्य साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत. गेल्या सात महिन्यांपासून आरोग्य अधिकारी व कर्मचारी हे कोरोना नियंत्रणासाठी झटत आहेत. नागरिकांनीदेखील योग्य ती दक्षता घ्यावी.