कोरोना लसीच्या दुसऱ्या डोससाठी नागरिक ‘वेटिंग’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:44 AM2021-05-11T04:44:11+5:302021-05-11T04:44:11+5:30
२०११च्या जनगणनेनुसार रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या १ लाख ७३ हजार आहे, तर शहराची लोकसंख्या ३४ हजार १३६ आहे. ...
२०११च्या जनगणनेनुसार रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या १ लाख ७३ हजार आहे, तर शहराची लोकसंख्या ३४ हजार १३६ आहे. ग्रामीण भागात मोप, कवठा, केनवड आणि मांगूळझनक येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून, शहरात ग्रामीण रुग्णालयात केंद्र देण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत संपूर्ण तालुक्यात केवळ २६ हजार ३४९ जणांचे लसीकरण झाले आहे. त्यात आरोग्य कर्मचारी ९८८, फ्रंटलाइन वर्कर १४५५, ज्येष्ठ नागरिक १२ हजार ५०९, ४५ ते ५९ वर्षे वयोगटांतील १० हजार ४७५ आणि १८ ते ४४ वयोगटांतील ९३० नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्या अनेकांच्या दुसऱ्या डोसची तारीख उलटून गेल्यानंतरही त्यांना आता लस मिळणे दुरापास्त झाले आहे. शहरातील लसीकरण केंद्रावर तर दैनंदिन केवळ १०० लसी उपलब्ध होत आहेत. त्यातून नागरिकांना दुसरा डोस द्यायचा की, पहिलाच डोस राहिलेल्या नागरिकांचे लसीकरण करायचे, अथवा १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना लस द्यायची, याबाबत आरोग्य विभागातील चमूसमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे.
.....................
२६,३४९
रिसोड तालुक्यात झालेले एकूण लसीकरण
९८८
आरोग्य कर्मचारी
१,४५५
फ्रंटलाइन वर्कर
१२,५०९
ज्येष्ठ नागरिक
१०,४७५
४५ ते ५९ वयोगटांतील नागरिक
९३०
१८ ते ४४ वयोगटांतील नागरिक
.........................
कोट :
सध्या कोरोना लसीकरणासाठी शहरासह ग्रामीण भागातूनही नागरिकांचे प्रमाण वाढलेले आहे. त्या तुलनेत लस उपलब्ध होत नाही. यामुळेच अडचण निर्माण झाली आहे. हा प्रश्न निकाली काढून सर्वांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले असून, नागरिकांनी संयम राखणे अपेक्षित आहे.
- डाॅ.पी.एन. फोपसे
तालुका आरोग्य अधिकारी, रिसोड