रिसोड शहर हगणदरीमुक्त
By admin | Published: March 18, 2017 03:12 AM2017-03-18T03:12:37+5:302017-03-18T03:12:37+5:30
राज्यस्तरीय समितीची घोषणा; विभागातील दुसरे हगणदरीमुक्त शहर.
रिसोड , दि. १७- स्वच्छ भारत अभियानांतर्गत रिसोड शहर हगणदरीमुक्त झाल्याची अधिकृत माहिती नगराध्यक्ष यशवंत देशमुख व मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी शुक्रवार, १७ मार्च रोजी दिली. त्यामुळे रिसोड हे अमरावती विभागातील हगणदरीमुक्त होणारे दुसरे शहर ठरले आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत रिसोड नगपरिषदेने रिसोड शहर ओडीएफ हगणदरीमुक्त घोषित केल्यामुळे व जिल्हास्तरीय समितीने पाहणी करुन हगणदरीमुक्त झाल्याचा अहवाल दिला आहे. त्यानुसार १६ मार्चला राज्यस्तरीय तपासणी समितीने शहरात फिरुन तपासणी केली व १७ मार्चला कार्यालयीन कागदपत्राची पाहणी करुन रिसोड शहर हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित केल्याची माहिती नगराध्यक्ष यशवंत देशमुख व मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी दिली. या राज्यस्तरीय तपासणी समितीमध्ये सोमनाथ शेटे अतिरिक्त आयुक्त अमरावती महानगरपालिका अमरावती, चंद्रकांत सोनावणे जिल्हा प्रशासन अधिकारी न.प. हिंगोली, दीपक बाचुळकर सर्मथ असोसिएशटस कोथरुड पुणे व कार्तिक लोखंडे यांचा समावेश होता. त्यांचे सोबत समन्वयक म्हणून दीपक मोरे जिल्हा प्रशासन अधिकारी वाशिम हे उपस्थित होते त्यांचे न.प. आगमनानंतर त्यांनी नगर परिषदेची अंतर्गत पाहणी केली. त्यानंतर शहरातील सार्वजनिक शौचालयाची पाहणी, तसेच नगर परिषद शाळांची पाहणी करुन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. लाभार्थींनी बांधलेल्या शौचालयांची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधून माहिती प्राप्त केली. तसेच रात्री ७ ते ९ पर्यंत व सकाळी ५ वाजता शहरातील प्रत्येक भागात फिरून हगणदरीमुक्त स्थळाची पाहणी करुन उघड्यावर कोणी शौचास बसला आहे का, याची पाहणी केली. १७ मार्च २0१७ ला सकाळी ६ ते ८ ओडीएफची पाहणी केली व नंतर न.प.मध्ये प्रशासकीय कागदपत्राची पाहणी करुन हगणदरीमुक्तीसाठी केलेल्या कार्याचा अहवाल याबाबत सर्व माहिती घेतली व त्यानुसार रिसोड न.प. हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित केले, अशी माहिती नगराध्यक्ष यशवंत देशमुख व मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी दिली. विशेष म्हणजे अमरावती विभागात रिसोड हे हगणदरीमुक्त होणारे हे दुसरेच शहर ठरले आहे. शहर हगणदरीमुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे मार्गदर्शन व सर्व नगरसेवक, कर्मचारी व नागरिकांचे सहकार्य लाभल्याचे मुख्याधिकारी पानझाडे यांनी सांगितले.