फुकट्या जाहिरातदारांमुळे शहर विद्रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:12 AM2021-01-08T06:12:04+5:302021-01-08T06:12:04+5:30
शहरांतर्गत रस्ते, मुख्य चौकांमध्ये व्यावसायिक प्रतिष्ठान, नेत्यांचे, मित्रांचे वाढदिवस तथा अन्य स्वरूपातील जाहिरातींचे फलक लावत असताना स्थानिक नगरपालिका प्रशासनाची ...
शहरांतर्गत रस्ते, मुख्य चौकांमध्ये व्यावसायिक प्रतिष्ठान, नेत्यांचे, मित्रांचे वाढदिवस तथा अन्य स्वरूपातील जाहिरातींचे फलक लावत असताना स्थानिक नगरपालिका प्रशासनाची रीतसर परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी आकारली जाणारी ठरावीक रक्कम अदा केल्यानंतरच जाहिरातबाजी करता येते. असे असताना वाशिम शहरात अनेक ठिकाणी कुठलीच परवानगी न घेता काही फुकट्यांनी जाहिरातबाजीचे फलक लावलेले आहेत. हा प्रकार सातत्याने सुरू असल्याने शहराचे विद्रूपीकरण होत आहे. शहरातील पाटणी चौक, रिसोड नाका, पुसद नाका, अकोला नाका, शिवाजी चौक या मुख्य ठिकाणी लोखंडी चौकट उभारून त्यावर मोठे होर्डिंग्ज लावणाऱ्या काही व्यावसायिकांनी मात्र रीतसर नगर परिषदेची परवानगी घेतल्याची माहिती नगर परिषदेतून प्राप्त झाली.
......................
प्रशासनाच्या डुलक्या
वाशिम शहरासह जिल्ह्यातील अन्य नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात अनेकांनी विनापरवानगी शहरातील विविध ठिकाणी जाहिरातींचे होर्डिंग्ज लावलेले आहेत. संबंधितांवर कारवाई करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
मुख्य चौकांमधून गेलेल्या रस्त्यांच्या मधोमध उभ्या करण्यात आलेल्या विजेच्या खांबांवर छोट्या स्वरूपातील जाहिरातींचे फलक लावण्याचा प्रकार बळावला आहे. याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
विनापरवानगी फलक लावणाऱ्यांमध्ये काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते अग्रेसर आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्यास पॉलिटिकल प्रेशर येत असल्याने कारवाईचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
.......................
होर्डिंगमधून पालिकेची कमाई
नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील रस्ते, चौकांमध्ये व्यावसायिक प्रतिष्ठानांकडून लावण्यात येणाऱ्या होर्डिंग्जमधून पालिकेला चांगली मिळकत होते. शहरात कुठेही होर्डिंग लावण्यापूर्वी नगरपालिकेत जाऊन ठरावीक रकमेची पावती घ्यावी लागते. त्याशिवाय जाहिरातबाजी करता येत नाही, असा नियम शासनाने घालून दिलेला आहे.
.....................
शहरात विनापरवानगी जाहिरातींचे होर्डिंग लावणाऱ्यांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. असा प्रकार कुठेही आढळून आल्यास संबंधिताकडून दंड वसूल केला जातो किंवा फलक जप्त केले जातात. यापुढे ही कारवाई अधिक गतिमान केली जाईल.
- अ. अजीज अ. सत्तार,
करनिरीक्षक, वाशिम
.....................
वाशिम शहरात एकमेव पाटणी चौकात मुख्य बाजारपेठ वसलेली आहे. नागरिक आपापली वाहने पार्किंगमध्ये न ठेवता बाजारपेठेतील दुकानांसमोर उभी करतात. यासह मन मानेल तेथे होर्डिंग लावले जातात. यामुळे शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत आहे.
- महेश धोंगडे,
सामाजिक कार्यकर्ता, वाशिम