व्यायामा’साठी नागरीक मैदानावर; क्रीडा संकुल पुन्हा गजबजले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 04:32 PM2020-09-26T16:32:56+5:302020-09-26T16:33:15+5:30
व्यायाम, मॉर्निंग वॉक, सरावासाठी युवावर्ग, नागरिक येत असल्याने क्रीडा संकुल पुन्हा गजबजत आहे.
वाशिम : 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल होत असून, जनजीवन पूर्वपदावर येत असून, एप्रिल महिन्यापासून बंदद्वार असलेले जिल्हा क्रीडा संकुलही सप्टेंबर महिन्यात व्यायाम, मॉर्निंग वॉक व विविध क्रीडा प्रकारांच्या सरावासाठी खुले झाले. येथील मैदानावर व्यायाम, मॉर्निंग वॉक, सरावासाठी युवावर्ग, नागरिक येत असल्याने क्रीडा संकुल पुन्हा गजबजत आहे.
देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून लॉकडाऊन असल्याने जिल्हा क्रीडा संकुलाचे मैदानही बंद केले होते. जिल्ह्यात जून महिन्यापर्यंत कोरोना नियंत्रण असतानाही, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा क्रीडा संकुलाचे मैदान व हॉल मात्र कुलूपबंद ठेवण्यात आला. जुलै, आॅगस्ट महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्याचबरोबर अनलॉकचे टप्पे सुरू झाले. सप्टेंबर महिन्यात ‘अनलॉक-४’ सुरू झाला आणि जिल्हा क्रीडा संकुलाचा बाह्य परिसर, मैदान नागरिकांना मॉर्निंग वॉक, व्यायाम, क्रीडा प्रकाराच्या सरावासाठी खुले करण्यात आले. पाच महिन्यापासून कॉलनी किंवा घर परिसरात मॉर्निंग वॉक, सराव, व्यायाम करणारे नागरिक आता क्रीडा संकुलाच्या मैदानावर येत असल्याचे दिसून येते.