संस्थेवर नियुक्ती मिळण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी, २२ जणांवर गुन्हा दाखल
By सुनील काकडे | Published: September 3, 2022 06:08 PM2022-09-03T18:08:34+5:302022-09-03T18:10:07+5:30
जमावावर नियंत्रणासाठी पोलिसांनी नाईलाजास्तव सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
वाशिम (सुनील काकडे) : शिक्षण संस्थेवर नियुक्ती मिळण्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २ सप्टेंबर रोजी येथे घडली. याप्रकरणी परस्परांविरूद्ध दाखल तक्रारींवरून पोलिसांनी २२ जणांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू असताना काही लोकांनी त्याठिकाणी जाऊन राडा घातला. जमावावर नियंत्रणासाठी पोलिसांनी नाईलाजास्तव सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
याप्रकरणी फिर्यादी मो. सोहेल मो. अय्यूब यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, कलंदरिया उर्दू हायस्कुलवर अहेफाजखान शफातुल्लाखान यांना सहायक शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणेबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना शाळेवर रुजू करून न घेतल्याने आरोपींनी अ. वहीद अ. रशीद यांना चाकू, काठी व थापडबुक्यांनी मारहाण केली. त्यावरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या गटातील बिलकीसबानो शफातुल्लाहखान यांनीही तक्रार दाखल केली. आरोपींनी घरात पेट्रोल टाकून मुलांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. त्यावरून पोलिसांनी दुसऱ्या गटातील आरोपींवर गुन्हे दाखल केले.
रुग्णालयातही झाला राडा
हाणामारीच्या घटनेनंतर पोलिसांनी जखमी झालेल्या व्यक्तींना मंगरूळपीरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र तिथेही काही लोकांनी येऊन पुन्हा राडा घातला. दोन्ही गटातील आक्रमक झालेल्या लोकांना आवरताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
पोलिसांकडून लाठीचार्ज
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी तत्काळ दाखल झाला. वातावरण चिघळत असल्याचे पाहून झालेल्या गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. या घटनेची मंगरूळपिरात सर्वत्र जोरदार चर्चा होत असल्याचे दिसत आहे.