बारावी निकाल: अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 02:09 PM2019-05-28T14:09:45+5:302019-05-28T14:19:11+5:30
वाशिम जिल्ह्याचा निकाल ९०.४० टक्के लागला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा पहिल्या स्थानावर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षा निकाल २८ मे रोजी जाहिर झाला असून, वाशिम जिल्ह्याचा निकाल ९१.५५ टक्के लागला आहे. अमरावती विभागात सलग तिसºया वर्षीही वाशिम जिल्हा प्रथम स्थानावर राहिला आला आहे.
जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १७ हजार९६० नियमित विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी १७ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १६ हजार ४३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९१.५५ अशी आहे. उत्तीर्ण १६ हजार ४३५ विद्यार्थ्यांमध्ये ९६१७ मुले व ६८१८ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची सरासरी टक्केवारी ९०.१८ तर मुलींची सरासरी टक्केवारी ९३.५५ अशी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली.
जिल्ह्यात सर्वाधिक निकाल वाशिम तालुक्याचा ९३.२७ टक्के लागला आहे. त्याखालोखाल मंगरूळपीर तालुका ९३.१८ टक्के, मानोरा तालुका ९३.१३ टक्के, रिसोड तालुका ९२.९५ टक्के, मालेगाव तालुका ८७.७५ टक्के तर कारंजा तालुक्याचा सर्वात कमी अर्थात ८६.५२ टक्के निकाल लागला आहे. गतवर्षी जिल्ह्यात मंगरूळपीर तालुक्याचा सर्वाधिक निकाल लागला होता.
वाशिम तालुक्यात २६८३ मुले व १८३७ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २४७९ मुले व १७३७ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९२.४० तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.५६ अशी आहे. मालेगाव तालुक्यात १४३१ मुले व ८५५ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १२३१ मुले व ७७५ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८६.०२ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९०.६४ अशी आहे. रिसोड तालुक्यात २८२९ मुले व १६०९ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २६०६ मुले व १५१९ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९२.१२ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.४१ अशी आहे. कारंजा तालुक्यात १२६२ मुले व ११६४ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १०४३ मुले व १०५६ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८२.६५ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९०.७२ अशी आहे. मंगरूळपीर तालुक्यात १२१८ मुले व १०११ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १११९ मुले व ९५८ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९१.८७ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.७६ अशी आहे.
मानोरा तालुक्यात १२४१ मुले व ८१२ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी ११३९ मुले व ७७३ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९१.७८ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.२० अशी आहे.
जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९६.३० टक्के, कला शाखेचा ८६.९६ टक्के, वाणिज्य शाखेचा ९६.०६ टक्के तर व्होकेशनल शाखेचा ८३.३२ टक्के निकाल लागला आहे. यावर्षी इयत्ता बारावीच्या पुनर्परिक्षार्थींचा निकाल ४३.३३ टक्के लागला आहे. ९१४ पुनर्परिक्षार्थींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये ७४६ मुले आणि १६८ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ९१४ पुनर्परिक्षार्थींनी परीक्षा दिली असून, ३९६ पुनर्परिक्षार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ३२३ मुले आणि ७३ मुलींचा समावेश असून, मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ४३.४० तर मुलींची टक्केवारी ४३.४५ अशी आहे.