विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर येणार वर्गोन्नत शेरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:43 AM2021-05-06T04:43:14+5:302021-05-06T04:43:14+5:30
वाशिम : गतवर्षापासून कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला असून, यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. कोरोनामुळे ...
वाशिम : गतवर्षापासून कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला असून, यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. कोरोनामुळे परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे गुणपत्रिका दिल्या जातील; परंतु त्यावर उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असा शेरा देण्याऐवजी आरटीईनुसार ‘वर्गोन्नत’ असा शेरा दिला जाणार आहे.
कोरोनामुळे शिक्षण व्यवस्था प्रभावित झालेली आहे. कोरोनाकाळात परीक्षा घेणे शक्य नाही. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ६ एप्रिल रोजी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांबाबत नेमकी कार्यवाही कशी करावी याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यंदा कोरोनाच्या कारणामुळे पहिली ते चवथीचे वर्ग सुरू होऊ शकले नाहीत. ज्या विद्यार्थ्यांचे संकलित मूल्यमापन करता आले नाही, त्यांना आरटीई कायद्याच्या कलम १६ नुसार पुढच्या वर्गात वर्गोन्नत करण्यात येणार आहे. मात्र, त्यांच्या प्रगती पुस्तकावर आरटीई ॲक्ट २००९ कलम १६ नुसार वर्गोन्नत असा शेरा राहणार आहे. राज्यात पाचवी ते आठवीच्या शाळा १५ दिवसांसाठी सुरू करण्यात आल्या होत्या. तर अनेक ठिकाणी पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. अशा विद्यार्थ्यांचे शाळांकडून संकलित मूल्यमापन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची संपादन क्षमता लक्षात घेऊन त्याचे रूपांतर १०० गुणांमध्ये करण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांची श्रेणी निर्धारित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
०००००००
शाळेत विशेष प्रशिक्षणाचे निर्देश
यंदा ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढच्या वर्गात पाठविण्यात येणार आहे. त्यांचा अभ्यास मागे पडण्याची भीती आहे. त्यामुळे पुढील सत्राच्या सुरुवातीलाच शाळेत विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देशही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिले आहेत. त्यात विद्यार्थिमित्र या पुस्तिकेचा आधार घेऊन नियमित वर्ग अध्यापन करण्याचेही निर्देश आहेत. तसेच यंदाचे नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम आखण्यात येणार आहे.
कोट
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केलेला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित करून गुणपत्रिकेवर वर्गोन्नत शेरा देण्याबाबत सूचना आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वाशिम
०००
पहिलीतील विद्यार्थी १९६९०
दुसरीतील विद्यार्थी २०१९८
तिसरीतील विद्यार्थी १९६९८
चवथीतील विद्यार्थी २११७७
०००
मुले घरात कंटाळली
मागील एका वर्षापासून शाळेला सुटी आहे. त्यामुळे घरात राहून कंटाळा येत आहे; परंतु कोरोनामुळे नाईलाज आहे.
- मनन अमरलाल रमवाणी
कानडे इंटरनॅशनल स्कूल, वाशिम
००००००
शाळेला सुटी असल्याने घरात मोबाईल खेळणे, टीव्ही पाहणेही आता कंटाळवाणे वाटत आहे. शाळेतील मजा काही औरच असते.
- आरुषी दीपक अवचार
सनराईज इंग्लिश स्कूल, मालेगाव
००००
शाळा बंद असल्याने ऑनलाईन पद्धतीने अभ्यास केला. एका वर्षापासून घरीच असल्याने शाळेची आठवण येत आहे. सुट्यांमुळे कंटाळवाणे वाटते.
- श्रेयस प्रमोद ढाकरके
हॅपी फेसेस स्कूल, वाशिम
०००