घाण साफ केली, कचरा उचलला; पण त्याचा मोबदला नाही मिळाला

By सुनील काकडे | Published: October 9, 2023 02:13 PM2023-10-09T14:13:00+5:302023-10-09T14:13:21+5:30

सफाई कामगार, ट्रॅक्टर चालक-मालकांचे बेमुदत उपोषण

cleaned up dirt, picked up trash; But he was not paid | घाण साफ केली, कचरा उचलला; पण त्याचा मोबदला नाही मिळाला

घाण साफ केली, कचरा उचलला; पण त्याचा मोबदला नाही मिळाला

googlenewsNext

वाशिम : मध्यंतरी कंत्राट संपुष्टात आल्याने घंटागाड्या बंद होत्या. यामुळे नगर परिषदेने पर्याय म्हणून कंत्राटदारामार्फत नेमल्या जाणारे स्वच्छता कामगार आणि खासगी ट्रॅक्टर लावून कचरा संकलनाचे काम सुरू केले. त्यानुसार, कामगार व ट्रॅक्टर चालकांनी इमानेइतबारे काम करत घरोघरी जावून कचरा उचलला, शहरातील घाण साफ केली. असे असताना सहा महिन्याचे वेतन संबंधितांना अद्यापपर्यंत मिळाले नाही. याबाबत सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याने अखेर संतापलेले सफाई कामगार, ट्रॅक्टर चालक व मालकांनी सोमवार, ९ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला.

युवा सेनेच्या नेतृत्वात उपोषणास बसलेल्या मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, जानेवारी ते जुलै २०२३ या सात महिन्यात कंत्राटी तत्वावर कचरा उचलण्याचे ट्रॅक्टर चालकांचे वेतन थकीत आहे. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला; मात्र हाती काहीच लागले नाही.

तथापि, ३३ सफाई कामगार आणि २१ ट्रॅक्टर चालकांच्या कुटूंबावर वेतन न मिळाल्याने उपासमारीची वेळ ओढवली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत उद्भवलेल्या या प्रश्नामुळे आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. संबंधितांनी अंगीकारलेल्या या अन्यायकारक धोरणास कंटाळून अखेर संबंधितांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून मोठ्या संख्येत एकत्र येत बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी बोलून दाखविला.
उपोषणकर्त्यांमध्ये युवा सेना जिल्हा सचिव गजानन ठेंगडे, अजय रणखांब, केदारनाथ रणखांब, रवि बांगळ, पंढरी मोठ, अरूण भोंगळ, सुनील रणखांब, शंकर जाधव, गजानन गवळी, गणेश गोटे, गजानन गवळी, गणेश गोटे, शिवम रणखांब, सुजन रणसिंगे, शिवाजी गवळी, मोहन जाधव, दिपक खंडारे, मिठ्ठू मेसरे, गोपाल कोठेकर, विजय गवळी, रामा बांगर यांच्यासह ६१ जणांचा समावेश आहे.

कामाचे पैसे मिळत नसतील तर जगायचे कसे?
तब्बल सहा महिने प्रत्येक घरासमोर जावून ओला आणि सुका कचरा उचलत असताना आरोग्याची देखील आम्ही काळजी नाही घेतली. कुटूंबाचे पालनपोषण करण्याची जबाबदारी आमच्यावर असल्याने कामात कधीच कुचराई केली नाही. असे असताना सहा महिन्यांचे वेतन मिळाले नाही. कामाचे पैसे मिळत नसतील तर जगायचे कसे, असा सवाल उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

शहरात कचरा संकलनाच्या कामाचा कंत्राट दिला जातो. त्यानुसार, मध्यंतरी ट्रॅक्टरने कचरा संकलन करण्याचे कामही कंत्राटदारामार्फतच करण्यात आले. संबंधिताने सफाई कामगार आणि ट्रॅक्टर चालकांचे वेतन करायला हवे होते. नगर परिषदेचा सफाई कामगार किंवा ट्रॅक्टर चालकांशी थेट संबंध येत नाही. - निलेश गायकवाड, मुख्याधिकारी, न.प., वाशिम

Web Title: cleaned up dirt, picked up trash; But he was not paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.