वाशिम जिल्ह्यातील ४९१ गावांत स्वच्छतेचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 06:06 PM2018-10-01T18:06:32+5:302018-10-01T18:07:04+5:30
वाशिम : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये १ सप्टेबर ते १ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छताविषयक कार्यक्रम राबवून स्वच्छतेचा जागर करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये १ सप्टेबर ते १ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छताविषयक कार्यक्रम राबवून स्वच्छतेचा जागर करण्यात आला. ग्रामीण संस्कृतीदर्शक अशा बैलबंडी, लेझिम पथकाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देत गावकºयांचे लक्ष वेधून घेतले.
सर्वसाधारणत: ग्रामीण भागात बºयाच प्रमाणात अस्वच्छता असल्याने विविध आजारांना जणू निमंत्रणच मिळते. ग्रामीण भागात सामाजिक आरोग्याचा संदेश देणे, दैनंदिन साफसफाई, स्वच्छतेच्या सवयी लावणे, शौचालयाचा नियमित वापर करणे, सांडपाणी व्यवस्थापन यासह स्वच्छतेबाबत लोकचळवळ उभी करणे आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान १ सप्टेंबरपासून राबविण्यात येत आहे. २ आॅक्टोबर रोजी या अभियानाचा समारोप असून, आतापर्यंत ४९१ ग्रामपंचायतींमध्ये विविध कार्यक्रम, उपक्रम राबविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद कार्यालयांतर्गत येणारे अधिकारी व कर्मचाºयांवर या ४९१ ग्रामपंचायतींमधील कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. जिल्हयात कलापथकाव्दारे प्रबोधन करण्याबरोबरच लेझीम पथक, बैलबंडी अशा अस्सल ग्रामीण संस्कृतीदर्शक माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, सभापती विश्वनाथ सानप, सुधीर गोळे, यमुना जाधव, पानुताई जाधव यांच्यासह जि.प. सदस्य, पं.स. पदाधिकारी व सदस्य, सरपंच व ग्रा.पं. सदस्य, विभागप्रमुख, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्राम पंचायतचे कर्मचारी व ग्रामस्थांची उपस्थिती लाभली होती.