कारंजालाड शहरात स्वच्छतेचे ‘वाटोळे’
By admin | Published: June 21, 2014 12:19 AM2014-06-21T00:19:41+5:302014-06-21T00:34:23+5:30
स्वच्छता अभियान राबविण्याची आवश्यकता : घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
कारंजालाड : जैनांची काशी, दत्त महाराजांचे जन्मस्थान तसेच शैक्षणिक दर्जा उंचावलेल्या कारंजा शहरामध्ये भाविक दूरदूरून दर्शनासाठी येतात; मात्र नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील खाद्य विक्रीच्या ठिकाणी चौकाचौकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ढिगारे साचले आहे. त्याकरीता पावसाळा सुरु होण्यापूर्वी नाल्यातील साचलेली घाण साफ करावी अशी मागणी शहरातील नागरिकाकडून होत आहे.
शहरातील मेन रोडच्या नाल्यामध्ये मोठय़ा प्रमाणात घाण, काडी कचरा साचल्याने पावसाळ्यात पाणी नालीतून न वाहता बाहेरुन वाहून जाते. त्यामुळे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात घाण साचते. तीच रस्त्यावरील घाण व कचरा पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात साचला आहे. त्यामुळे येणार्या पशू पालकांना मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शहरातील जयस्तंभ चौक, आंबेडकर चौक, शिवाजी चौक, बस स्टॅन्ड, मुलजी जेठा हायस्कूल परिसर, गवळीपुरा आठवडी बाजार टिळक चौक आदी ठिकाणी कचर्याचे ढीग साचले आहे. तेच ढिग पाउस आला की नालीत जाते. त्यामुळे पाऊस तुटूंब आला की नाल्या भरुण जाते. ते घाणीचे पाणी रस्त्यावर येउन रहदारीला नाहक त्रास सहन करावा लागतो. काहीवेळा पाउस थांबला की, घाणीच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. शहरात स्वच्छता निर्माण व्हावी याकरीता नगर परिषदने स्वच्छता अभियान राबवावे अशी मागणी आहे.