वाशिम जिल्ह्यात ६७५ गावांमध्ये स्वच्छतेबाबत श्रमदान !
By संतोष वानखडे | Published: October 1, 2023 11:21 AM2023-10-01T11:21:14+5:302023-10-01T11:22:59+5:30
स्वच्छता ही सेवा मोहीम : शहरांमध्येही स्वच्छतेचा जागर
संतोष वानखडे
वाशिम : स्वच्छता ही सेवा या अभिनव मोहीमेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून १ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील ६७५ गावांमध्ये स्वच्छतेबाबत सकाळी ८ ते ११ या वेळेत श्रमदान करण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यातील गाव, तालुका व पंचायत समिती स्तरावर कचरामुक्तीसाठी श्रमदान कार्यक्रम राबविण्याची सूचना केली होती. त्याची प्रभावी अंमलबजावणी म्हणून जिल्हा परिषदेचा पाणी व स्वच्छता विभागाने शनिवारी ( दि.३० ) चोख नियोजन केले. श्रमदान करण्याबाबत गावपातळीवरील सर्व प्रशासकीय यंत्रणेला सूचना दिल्या होत्या. रविवारी ग्रामीण भागात सकाळपासूनच स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यामध्ये शाळकरी मुलांचा सहभागही घेण्यात आला.
शहरांमध्येही स्वच्छतेचा जागर !
वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा या प्रमुख सहा शहरांमध्ये तहसिल, न.प. मुख्याधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्याच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. वाशिम शहरात विद्यार्थ्यानी रॅली काढून स्वच्छतेचा जागर केला.