लोककलावंतांच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यात स्वच्छतेचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 02:33 PM2017-11-15T14:33:09+5:302017-11-15T14:36:00+5:30
वाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष अभियान हाती घेतले असून, १५ नोव्हेंबर रोजी ग्रामीण भागात लोककलावंतांच्या माध्यमातून शौचालय बांधकाम करण्यासंदर्भात प्रबोधन करण्यात आले.
वाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष अभियान हाती घेतले असून, १५ नोव्हेंबर रोजी ग्रामीण भागात लोककलावंतांच्या माध्यमातून शौचालय बांधकाम करण्यासंदर्भात प्रबोधन करण्यात आले.
जिल्ह्यातील प्रत्येक गाव हगणदरीमुक्त करणे, गावात स्वच्छता राखणे यासह स्वच्छतेचा संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेच्यावतीने विशेष अभियान राबविण्यात येत आहे. १५ नोव्हेंबर रोजी मानोरा, मंगरूळपीर, वाशिम तालुक्यातील गावांना भेटी देत जनजागृती करण्यात आली. शौचालय नसलेल्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी पंचाळा, उकळीपेन येथे गृहभेटी देऊन शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन केले. शौचालय बांधकाम करण्यासाठी पात्र लाभार्थींना शासनातर्फे १२ हजार रुपयांचे अनुदान मिळत असून, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा आणि वैयक्तिक शौचालय बांधकाम करावे, असे आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा स्वच्छता व पाणी विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनीदेखील आपल्या चमूसह गावांना भेटी देऊन जनजागृती केली. दरम्यान, लोककलावंतांच्या चमूने प्रबोधनातून शौचालयाचे महत्त्व पटवून दिले. घरातील महिलांची प्रतिष्ठा जपण्यासाठी शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन केले.