वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 04:44 PM2019-01-21T16:44:10+5:302019-01-21T16:44:32+5:30
वाशिम : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात सद्या स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धा राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शौचालयांची रंगरंगोटी करून त्यावर स्वच्छतेचे संदेश रेखाटले जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात सद्या स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धा राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शौचालयांची रंगरंगोटी करून त्यावर स्वच्छतेचे संदेश रेखाटले जात आहेत. यामाध्यमातून उघड्यावरील हगणदरीला पूर्णत: आळा घालून शौचालयांचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे.
केंद्र सरकारच्या पेयजल, स्वच्छता मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने निर्देशित केल्याप्रमाणे १ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामिण भागातील प्रत्येक कुटुंबास शौचालय आपले वाटावे. स्वच्छता सुविधा स्पष्टपणे नजरेत याव्यात. शौचालय स्वच्छ व सुंदर दिसावे, या उद्देशाने राज्यभरातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे वाशिममधील सर्व ग्रामपंचायतींमध्येही स्वच्छ, सुंदर स्पर्धा राबविण्यात येत आहे.
१ ते ३१ जानेवारी या अभियान कालावधीत उत्कृष्ट काम केलेल्या राज्य, जिल्हा, कुटूंबांची राज्यस्तरावर पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या समितीकडून निवड करून संबंधितांना सन्मानित केले जाणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून आपापली शौचालये रंगविली आहेत. त्यावर रेखाटण्यात आलेले स्वच्छताविषयक संदेश लक्ष वेधून घेत आहेत.
प्रजासत्ताक दिनापासून वारकरी करणार जनजागृती!
समाजातील अंध्दश्रध्दा, अनिष्ठ रुढी परंपरांवर आघात करुन समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी अग्रेसर असलेला वारकरी संप्रदाय हागणदरीमुक्ती आणि शौचालय वापरासंबंधी प्रजासत्ताक दिन अर्थात २६ जानेवारीपासून जनजागृती करणार आहेत.