शाळांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 03:23 PM2018-09-19T15:23:50+5:302018-09-19T15:24:43+5:30
वाशिम : ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न म्हणून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने १५ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सुरूवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न म्हणून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने १५ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सुरूवात झाली आहे. या अभियानांतर्गत जिल्हा परिषदेसह खासगी शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. १९ सप्टेंबर रोजी शेलुखडसे, काटा, रिठद यासह अन्य ठिकाणी स्वच्छताविषयक कार्यक्रम घेण्यात आले.
स्वच्छतेसंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती करणे, गाव हगणदरीमुक्त करणे, शासकीय, निमशासकीय कार्यालय परिसर स्वच्छ ठेवणे, सर्वांना स्वच्छतेच्या सवयी लावणे याबरोबरच स्वच्छतेबाबत लोकचळवळ उभी करणे आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जात आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, तालुकास्तरीय विविध विभागातील वर्ग एक ते तीन दर्जाचे अधिकारी, कर्मचाºयांना जिल्ह्यातील एक, एक गाव नेमून देण्यात आले आहे. या अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधींसह स्थानिक स्वराज्य संस्था व स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग घेणे, गृहभेटी, ग्रामसभा, डिजिटल रथ, कलापथक आणि निगराणी समितीमार्फत शौचालयाच्या वापराबाबत जनजागृती करणे तसेच शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र व उपकेंद्र आदींना भेटी देणे, शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, बसस्थानक आदी सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छतेचा जागर आदी कार्यक्रमाचे नियोजन आहे. १९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील शाळांमध्ये स्वच्छताविषयक कार्यक्रम घेण्यात आले.