‘समाजकल्याण’चा लिपिक एसीबीच्या जाळय़ात
By admin | Published: March 25, 2017 02:30 AM2017-03-25T02:30:54+5:302017-03-25T02:30:54+5:30
शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून ४00 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेतले.
वाशिम, दि. २४- शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून ४00 रुपयांची लाच स्वीकारताना सहायक आयुक्त समाजकल्याण विभागात कार्यरत लिपिकाला एसीबीच्या पथकाने २३ मार्च रोजी रंगेहात पकडून ताब्यात घेतले. कनिष्ठ लिपिक सुरेश सुदाम जाधव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे चर्मोद्योगासाठी गटई स्टॉल (खोका) मिळण्याकरिता समाजकल्याण विभागात रीतसर अर्ज केला होता. या योजनेच्या पात्र लाभार्थींंच्या यादीत तक्रारदाराच्या वडिलांचे नाव अपात्र ठरविण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अर्ज पात्र करण्याच्या मोबदल्यात लिपिक जाधव याने ५00 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार २२ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने केली. यावेळी वाशिम एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता तडजोडीअंती ४00 रुपयात काम करून देण्याचे मान्य केले. तेव्हा एसीबीच्या पथकाने सापळा रचून केलेल्या कारवाईत जाधव याला ४00 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले. लाचखोर जाधव विरोधात कलम ७, १३ (१) (ड) सहकलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.