वातावरणात बदल: साथरोग बळावले; दवाखानेही हाऊसफुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 05:46 PM2019-09-03T17:46:07+5:302019-09-03T17:46:40+5:30
सर्दी, ताप, खोकला यासह अन्य साथरोगांनी डोके वर काढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने सर्दी, ताप, खोकला यासह अन्य साथरोगांनी डोके वर काढले आहे. साथरोगामुळे सरकारी रुग्णालयांसह खासगी दवाखानेही हाऊसफुल झाले आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप, डायरिया, विषमज्वर आदी साथीच्या आजारांची लागण शहरासह ग्रामीण भागात होत असते. यावर्षी जून, जुलै या महिन्याच्या तुलनेत आॅगस्ट महिन्याच्या मध्यानंतर आणि सप्टेंबर महिन्यात वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात विषाणूजन्य तापाची लागण झाल्याचे दिसून येते. ग्रामीण व शहरी भागातील रुग्णालयांमध्ये विषाणुजन्य तापाच्या साथरोगाची लागण झालेले रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले. या विषाणूजन्य तापासोबत सर्दी, खोकल्याचा जबर त्रास रुग्णांना होत असल्याने ग्रामीण व शहरी भागातील खासगी रुग्णालयात अशा रुग्णांची कमालीची गर्दी होऊ लागली. विषाणूजन्य तापाची लागण होण्यामुळे अनेक रुग्णांच्या शरीरातील पांढºया पेशींची मोठ्या संख्येत वाढ किंवा घट होत आहे. विशेषत: वातावरणातील बदलाचा फटका मोठ्या संख्येने बालरूग्णांना बसत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, जिल्हा सामान्य रुग्णालयांमधील रुग्णांसाठीच्या खाटा कमी पडू लागल्या. खासगी दवाखानेदेखील हाऊसफुल झाले आहेत.
वातावरणातील बदलामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढले आहे. सर्दी, ताप, खोकला, पेशी कमी होणे यासह अन्य साथरोगाची लक्षणे आढळून येत आहे. रुग्णांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा.
- डॉ. विजय कानडे,
बालरोग तज्ज्ञ, वाशिम