वातावरण बदलामुळे साथीचे आजार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 02:14 PM2020-02-03T14:14:50+5:302020-02-03T14:15:07+5:30

सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, प्लेटलेट कमी होणे आदी आजार नागरिकांना जडत आहेत.

Climate change ; viral fever patients increases | वातावरण बदलामुळे साथीचे आजार वाढले

वातावरण बदलामुळे साथीचे आजार वाढले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मध्यंतरी एक ते दोन दिवस वातावरणातील गारवा गायब होऊन काहीअंशी उष्णता निर्माण झाली; मात्र गत काही दिवसांपासून पुन्हा सातत्याने वातावरणात परिणामकारक बदल होत आहेत. त्यातच गत दोन दिवसांपासून ढगाळी वातावरण कायम असून सूर्यदर्शन दुर्लभ झाले आहे. या सर्व प्रतिकुल परिस्थितीमुळे विविध आजारांची लागण होण्यासोबतच रब्बी हंगामातील पिकांनाही फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात ढगाळ वातावरण तसेच पहाटेच्या सुमारास धुके, त्यानंतर गारवा, दुपारी काही प्रमाणात ऊन्ह आणि सायंकाळी पुन्हा गारवा निर्माण होत आहे. वातावरणातील या बदलामुळे बालकांसह नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, प्लेटलेट कमी होणे आदी आजार नागरिकांना जडत आहेत. विशेषत: लहान मुलांना सर्दी, खोकल्याचा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज साधारणत: २५० ते ३०० रुग्ण विविध आजारांच्या तपासणीसाठी येत आहेत. २ फेब्रूवारीलाही सरकारी दवाखान्यात उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. खासगी दवाखान्यातही रुग्णांची तुफान गर्दी होत आहे.
वातावरणातील बदल लहान बालक आणि वयोवृद्ध नागरिकांना शक्यतोवर सहन होत नाही. लहान मुलांना सर्दी, ताप आणि खोकला या आजाराने ग्रासले असल्याचे वाढलेल्या रुग्ण संख्येवरून दिसून येत आहे. ग्रामीण व शहरी भागातील खासगी रुग्णालयात ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला, विषमज्वर अशा रुग्णांची गर्दी होत आहे. त्यातच काही प्रमाणात हिवतापाचेही रुग्ण दाखल होऊ लागले आहेत. वातावरणातील बदलांशी लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांचे आरोग्य तेवढ्या तत्परतेने जुळवून घेत नसल्याने साहजिकच आरोग्य बिघडत असल्याचा दावा काही डॉक्टरांनी केला. खासगी दवाखान्यातही रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, बहुतांश रुग्ण हे व्हायरल फिव्हरचे असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.


वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने सर्दी, ताप, डोकेदुखी व काही प्रमाणात विषमज्वर आदी आजारांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे. वातावरणातील बदलामुळे विशेषत: लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, तापेची लक्षणे आढळून येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. विविध प्रकारच्या आजारांची लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. अंबादास सोनटक्के
जिल्हा शल्य चिकित्सक
जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम

 

Web Title: Climate change ; viral fever patients increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.