पोलीस पोहोचण्याआधीच अवैध धंदे बंद
By admin | Published: January 7, 2015 01:04 AM2015-01-07T01:04:50+5:302015-01-07T01:04:50+5:30
लोकमत वृत्ताचा प्रभाव; वाशिम जिल्हय़ातील अवैध धंदे तत्काळ बंद करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे निर्देश.
वाशिम : परिसरात अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात अवैध धंदे फोफावले आहेत. वरली मटका, ताजी वरलीसह टेबल एक्का बादशहा, रमी, तीन पत्ते खेळल्या जात असल्याचे लोकमतने ५ जानेवारी रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आणले होते. वृत्त प्रकाशित झाल्याबरोबर घटनास्थळी पोलीस पोहोचण्याआधीच अवैध धंदे कारवाईच्या धसक्याने बंद करण्यात आलेत. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही अवैध धंदे बंद करण्यासाठी उपाय योजना आखून संबंधिताना निर्देश दिलेत.
वाशिम शहर व परिसरात बेधडकपणे खुलेआम सुरु असलेल्या अवैद्य धंद्यांना पोलीस विभागाच्या वतीने लगाम लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून, ज्या ज्या ठिकाणी अवैध धंदे चालतात याची माहिती घेऊन त्या भागाची पाहणी आज करण्यात आली. काकडदाती परिसरातही पोलिसांनी आज भेट दिली असता तेथे त्यांना कोणताच अवैध धंदे सुरू असल्याचे आढळून आले नाही. पोलीस पोहोचण्याआधीच अवैध धंदे चालविणार्यांनी आपले बस्तान गुंडाळले होते. या लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनमुळे जिल्हय़ात सुरू असलेले छोटे-मोठे अवैध धंदेही बंद झाल्याचे चर्चेवरून दिसून आले. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला असता आपण यापूर्वीही संबंधित सर्व ठाणेदारांना अवैध धंद्यांबाबत ताकीद देण्यात आली आहे. यासंदर्भात विशेष लक्ष देऊन अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.