पावती पुस्तकाअभावी पोस्टातील विज देयक भरणा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:15 PM2017-11-24T22:15:55+5:302017-11-24T22:18:40+5:30
ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी वीजदेयक अदा करण्यासाठी सोयीचे असलेल्या टपाल कार्यालयात चार महिन्यांपासून पावती पुस्तकाचा अभाव आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांची देयके रखडत असल्याने त्यांना देयक अदा करण्यास विलंब झाल्याप्रकरणी नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी : ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी वीजदेयक अदा करण्यासाठी सोयीचे असलेल्या टपाल कार्यालयात चार महिन्यांपासून पावती पुस्तकाचा अभाव आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांची देयके रखडत असल्याने त्यांना देयक अदा करण्यास विलंब झाल्याप्रकरणी नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. हा भुर्दंड टाळण्यासाठी अनेक ग्रामस्थ शहरातील वीज वितरणच्या कार्यालयात धाव घेत असून, त्यासाठीही त्यांना खर्च करावा लागत आहे.
इंझोरी परिसरात वीज वितरणचे ५०० ते ६०० घरगुती विज ग्राहक आहेत. हे सर्व ग्राहक दर महिन्याला गावातील टपाल कार्यालयात नियमित देयकाचा भरणा करतात. दर महिन्याला या ग्राहकांकडून जवळपास ७ ते ८ लाख रुपयांचा भरणा केला जातो, मात्र मागील ४ महिन्यापासून येथील टपाल कार्यालयात आॅफीस मध्ये विज देयकाचा भरणा केल्यानंतर मिळणाºया पावतीचे पुस्तकच उपलब्ध नाही. त्यामुळे टपाल कार्यालयातून ग्राहकांना परत पाठविले जात आहे. वीज देयकास विलंब होऊ नये म्हणून येथील वीजग्राहक २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या मानोरा शहरात वीज वितरणच्या कार्यालयात धाव घेत आहेत. त्यासाठी खर्च करावा लागतोच शिवाय त्या ठिकाणी देयक अदा करणाºयांची संख्या मोठी असल्याने दिवसभर ताटकळत बसावे लागते. तथापि, देयक नियोजित तारखेला भरण्यात आले नाही, तर अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागणार असल्याने ग्राहकांची पंचाईत होत आहे. वीजग्राहकांची समस्या लक्षात घेऊन इंझोरी येथील टपाल कार्यालयात पावती पुस्तक उपलब्ध क रावे, अशी मागणी शेकडो वीजग्राहकांच्यावतीने करण्यात येत आहे.