राज्यभरात महा ई- सेवा केंद्र संचालक पाळणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:32 PM2018-09-07T12:32:28+5:302018-09-07T12:33:18+5:30
केंद्रातील किमती साहित्याची तोडफोड केल्याचा राज्यभरातील महा ई-सेवा केंद्र संचालकांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: बुलढाणा जिल्ह्यातील डोनगाव ता. मेहकर येथील महा ई सेवा केंद्र चालकांवर हल्ला करून केंद्रातील किमती साहित्याची तोडफोड केल्याचा राज्यभरातील महा ई-सेवा केंद्र संचालकांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्याचा निर्णय संघटनांनी घेतला असल्याची माहिती महा ई-सेवा केंद्र संचालक संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रभाकर भेंडेकर यांनी दिली आहे. या संदर्भात विविध संघटनांकडून प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील घडलेली घटना म्हणजे सेवा हमी कायद्याची प्रभावी आणि वेळेच्या आत अंमलबजावणी करण्यात प्रशासन अक्षम ठरल्यामुळे संतप्त अर्जदाराने स्थानिक गावगुंडांच्या मदतीने केलेला हल्ला होय, यात प्रशासनातील अधिकारी आणि हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी राज्यातील सर्व महा ई सेवा केंद्र(आपले सरकार सेवा केंद्र) एक दिवसीय लाक्षणिक बंद पाळतील असे महा ई-सेवा केंद्र संचालक संघटनेचे राज्य अध्यक्ष भेंडेकर यांनी सांगितले. एका बाजूने सरकार आमच्या अन्यायाच्या कोणत्याही प्रकारच्या निवेदनावर कार्यवाही करत नसून, दुसरीकडे अशा प्रकारचे हल्ले होत असल्यामुळे न्याय मागणी कोणाकडे करावी अशी खंत महा-ई सेवा केंद्र संचालक राज्य संघटक माधुरी पवार सातारा यांनी व्यक्त केली, तसेच केंद्र सरकार तथा राज्य सरकारच्या घोषित झालेल्या सर्व योजना गावपातळीवरील लाभार्थ्यापर्यंत पोहोच करण्यात महा ई सेवा केंद्रांची मोठी भूमिका असल्यामुळे महा ई-सेवा केंद्र संचालकांवरील हल्ला प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, महा ई-सेवा केंद्र संचालक संघटनेच्यावतीने मंगरूळपीरच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी राज्य अध्यक्ष प्रभाकर भेंडेकर यांच्यासह सागर म्हैसने, शिवाजी गजभार, प्रकाश भगत, नितीन गावंडे, नीलेश भजने, सुनील स्वामी, चेतन गिरी, विजय परळीकर, धोंडू मनवर, उमेश गजभार बडवे यांच्यासह तालुक्यातील बहुतांश केंद्रसंचालक व सहकारी उपस्थित होते.