ढगाळ वातावरणामुळे शेतमाल खरेदीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:11 AM2021-01-08T06:11:40+5:302021-01-08T06:11:40+5:30
सद्यस्थितीत सर्वच शेतमालाचे दर तेजीत असल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांत शेतमालाची विक्रमी आवक होत आहे. त्यात सोयाबीनची दरदिवसाची आवक ७० ...
सद्यस्थितीत सर्वच शेतमालाचे दर तेजीत असल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांत शेतमालाची विक्रमी आवक होत आहे. त्यात सोयाबीनची दरदिवसाची आवक ७० हजार क्विंटलच्या घरात असतानाच आताना बाजारात नवी तूरही दाखल होत आहे. त्यामुळे बाजार समित्यांच्या शेडमध्ये शेतमाल टाकण्यासाठी जागा कमी पडत आहे. त्यात गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. एखादवेळी पाऊस पडल्यास शेतकऱ्यांची त्रेधातिरपिट उडण्याची आणि शेतमाल भिजून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. त्यामुळे बाजार समित्यांचे प्रशासनही खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी धडपड करीत आहे. यात शेतकऱ्यांचा शेतमाल शक्यतो शेडमध्येच टाकण्याचे आवाहन केले जात असून, व्यापाऱ्यांचा शेतमालही शेडमधून उचलण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
---------
शेतमालात आर्द्रता वाढण्याचीही शक्यता
सततच्या ढगाळ वातावरणामुळे बाजार समित्यांकडून खरेदी प्रक्रिया वेळेच्या आत पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे. विशेष म्हणजे एखादवेळी पाऊस पडल्यास शेतमाल भिजण्याची भीती आहेच शिवाय सततच्या वातावरणामुळे सोयाबीनसारख्या नाजूक शेतमालाची आर्द्रताही वाढण्याची भीती असून, असा प्रकार घडल्यास सोयाबीनचा दर्जा खालावण्याची शक्यता मुळीच नाकारता येणार नसल्याने शेतकऱ्यातही चिंतेचे वातावरण आहे.
-------------
कोट: ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे बाजार समिती अंतर्गत खरेदी प्रक्रिया सुरळीत आणि लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात पावसापासून शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
-नीलेश भाकरे, सचिव
कारंजा बाजार समिती