मंगरूळपिरात ढगाळी वातावरण कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:44 AM2021-05-21T04:44:08+5:302021-05-21T04:44:08+5:30
मंगरूळपीर : यावर्षी उन्हाळ्यात तुलनेने अधिक ऊन तापलेच नाही. मे महिन्यातही तापमानात वाढ होण्याऐवजी सातत्याने ढगाळी वातावरण कायम आहे. ...
मंगरूळपीर : यावर्षी उन्हाळ्यात तुलनेने अधिक ऊन तापलेच नाही. मे महिन्यातही तापमानात वाढ होण्याऐवजी सातत्याने ढगाळी वातावरण कायम आहे. यामुळे यंदा पावसाळ्याला लवकरच प्रारंभ होण्याचे संकेत वर्तविण्यात येत आहेत.
.....................
शिरपूर येथे दूध उत्पादकांचे नुकसान
वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरात दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स बंद राहत असल्याने मोठ्या प्रमाणात त्यांचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
.............
नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन
वाशिम : वाशिम- अकोला महामार्गावर वसलेल्या मेडशी येथे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. हे पाहता नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
...............
किन्हीराजा येथे पोलिसांकडून कारवाई
वाशिम : किन्हीराजा- मालेगाव मार्गावर पोलिसांनी गुरुवारी नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक व तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. नियम पाळण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
................
मालेगाव बसस्थानक घाणीच्या विळख्यात
वाशिम : तालुका मुख्यालय असलेल्या मालेगाव येथे काही वर्षांपूर्वी बसस्थानक उभारण्यात आले. मात्र, येथे अद्याप सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. विशेषत: मूत्रीघरात सदोदित घाण पसरलेली राहत आहे.
...................
रस्ता नादुरुस्त; नागरिक हैराण
वाशिम : शहरातील मन्नासिंह चौकापासून कालेश्वर मंदिरापर्यंतचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. न.प.ने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
..............
जुन्या शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत
वाशिम : जुन्या शहरातील ध्रुवचौक परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, तो अत्यल्प स्वरूपात होता. यामुळे अनेकांची गैरसोय झाली.
.............
वाहने मिळाल्याने पोलिसांची सोय
वाशिम : जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात काही दिवसांपूर्वी नवी दुचाकी वाहने समाविष्ट करण्यात आली. यामुळे विशेषत: रात्रगस्तीवर राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची सोय झाली आहे.
...............
कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले
जऊळका रेल्वे : ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोना चाचणी करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांचा आकडाही वाढल्याचे दिसून येत आहे.
..............
निवडणूक कर्मचाऱ्यांना मिळाले नाही मानधन
वाशिम : चालूवर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप मानधन मिळालेले नाही. निवडणूक विभागाने ते अदा करावे, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
........................
सेवा भवन उभारण्याची मागणी
वाशिम : मोहजा बंदी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणून सेवा भवन उभारावे, अशी मागणी स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
...........................
शेकडो शेतकरी मदतीपासून वंचित
मेडशी : परिसरात गतवर्षी परतीच्या पावसामुळे हजारो एकरांवरील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे असताना अनेकांना अद्याप मदत मिळालेली नाही. याकडे प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.
..............
बीएसएनएलची सेवा खंडित
वाशिम : प्रामुख्याने प्रशासकीय कार्यालयांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बीएसएनएल दूरध्वनीची सेवा अधूनमधून खंडित होत असल्याने अधिकारी, कर्मचारी वैतागले आहेत. सेवा सुरळीत ठेवण्याची मागणी होत आहे.